युपीएससी व एमपीएससीसाठी विषयाची निवड व नियोजनबद्ध अभ्यास महत्वाचा : जिल्हाधिकारी धीरजकुमार

नांदेड, ७ जुलै-एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी विषयाची निवड अभ्यासाचे सुक्ष्म नियोजन आणि त्याची योग्य प्रकारे अमलबजावणी करणे अत्यंत महत्वाचे असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.

नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेबाबत त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या हेतुने जिल्हा प्रशासनामार्फत जानेवारी २०११ पासून प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मान्यवरांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार काल येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार हेही यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.

युपीएससीची परीक्षा पद्धती व त्याचे बदलते स्वरुप याची सविस्तर माहिती देवून जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, तुमच्याकडे तयारीसाठी २ ते ३ वर्षाचा वेळ असेल तर क्रमीक पुस्तके वापरा आणि वेळ कमी असेल तर गाईड व तयार नोटस् वापरा. एका पेपरसाठी एक किंवा दोन दर्जेदार पुस्तक व एक गाईड वापरावे. अभ्यास करतांना विविध पुस्तकांचा वापर केल्यास अनेकदा मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. स्पर्धा परीक्षेसाठी चौफेर वाचन महत्वाचे असते. तसेच विषयाची निवड करतांना आवडीचे व स्वतःला अधिक ज्ञात असलेले विषय निवडल्यास अधिक गुण मिळवण्यास मदत होते.

स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना वाचनानंतर परीक्षेच्या पद्धतीनुसार विहित वेळेत पेपर सोडविण्याचा सराव करावा. तसेच विचारलेल्या प्रश्नाचा कल विचारात घेऊन थोडक्यात अचूक आणि मुद्देसूद उत्तर देणे अपेक्षित असते. पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी जलदगतीने उत्तरे लिहावी लागतात त्यासाठी परीक्षा पद्धती आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरुप याची पूर्णपणे माहिती असणे आवश्यक असते.

स्पर्धा परीक्षेसाठी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. उगीच कोणीतरी मित्र तयारी करतो म्हणून करु नका प्रथम मनाचा ठाम निश्चय करा आणि जिद्दिने अभ्यासाला सुरुवात करा म्हणजे हमखास यश मिळेल असे त्यांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार यांनी प्रथम स्वतःचे अनुभव थोडक्यात कथन करुन एमपीएससी परीक्षेसाठी तयारी करतांना मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी आपणाला जमेल किंवा नाही हा मनातील न्युनगड काढून टाकावा. कष्ट करणार्‍याला सर्वकाही साध्य करता येते, असे स्पष्ट करुन ते म्हणाले, विषय समजून अभ्यास करावा आणि ८ ते १५ दिवसांनी त्याची आवृत्ती करावी. मित्राचा गट करुन आपणच परीक्षेच्याधर्तीवर प्रश्नपत्रिका तयार करुन ती विहित वेळेत सोडविण्याचा सराव करायला हवा. परीक्षेत संपूर्ण प्रश्न सोडविता आले पाहिजेत आणि त्यासाठी परीपूर्ण अभ्यास करणे आवश्यक असते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राजेश भुसारी यांनी ग्रामगीता देवून जिल्हाधिकारी धीरजकुमार व पोलीस अधिकारी किरण कुमार यांचे स्वागत केले. तहसीलदार अरुणा संगेवार यांनी प्रास्ताविक माहिती दिली. या मार्गदर्शन वर्गास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.