पाणी कपातीबाबतचा निर्णय १५ जुलैनंतर घेणार – पवार

पुणे, दि. ६ – पावसाळा लांबल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात पाणी काही दिवस पुरेल इतकेच आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत शहराला पाणीपुरवठा नेहमीप्रमाणेच होईल. त्यानंतर मात्र पाणी वाटपाचे नियोजन कसे करायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पाण्याच्या नियोजनासंदर्भात पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. या बैठकीला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार वल्लभ बेनके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे व्यासपीठावर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरण साठ्यात केवळ १.३३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. तर १५ जुलैनंतर उपलब्ध पाणीसाठ्यातून पाण्याच्या पुरवठा एक दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला जाईल. पवना धरणात १८ टक्के पाणीसाठा असल्याने पिंपरी-चिवड शहरात पाण्याचा प्रश्‍न नाही. तसेच पावसाळा लांबल्याने सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामास व जलसंधारणाच्या कामास प्राधान्य देण्याच्या सूचना अजित पवार यांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Leave a Comment