काश्मीर आता गुंतवणुकदारांसाठीही नंदनवन

श्रीनगर दि.६- आजपर्यंत पर्यटकांसाठी नंदनवन असणारे जम्मूकाश्मीर आता आंतरराष्ट्रीय उद्योगसमुदायांसाठी गुंतवणुकीचेही नंदनवन बनत चालल्याचे दिसून येत आहे. गेली दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या छायेत असलेल्या काश्मीरमधील परिस्थिती आता लक्षणीयरित्या सुधारत असून त्यामुळे या राज्याच्या आर्थिक विकासाला वेगाने चालना मिळू लागली आहे.
Kashmir-Hotel
गेली कांही वर्षे येथील मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटनव्यवसायाला सततचे बॉम्ब हल्ले, चकमकी, गोळीबार यामुळे मोठे संकट निर्माण झाले होते. देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांनीही या नंदनवनाकडे पाठ फिरविली होती. पण यंदाच्या वर्षात आत्तापर्यंतच सुमारे ५ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली असल्याने पूर्वीचे पर्यटनाचे दिवस आता पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. पर्यटकांची वाढती संख्या ही येथील हॉटेल व्यवसायासाठी वरदान ठरू लागली आहेच पण विमानभाड्यातही आता वाढ करण्यात आली आहे. सध्या विविध ठिकाणाहून सुमारे तीस फ्लाईट श्रीनगर विमानतळावर येत आहेत. हॉटेल्स, हाऊसबोटी यांच्या दरातही वाढ झाली आहे.
srinagar-airport
अनेक वर्षांच्या अशांततेनंतर आता येथील बेकार तरूणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत व त्यामुळे राज्यांतर्गत तसेच परराज्यातूनही गुंतवणुकीचा ओघही वाढला आहे. अर्थात ही गुंतवणूक प्रामुख्याने हॉटेल्स व पर्यटकांसाठी देण्यात येणार्‍या सुविधा क्षेत्रात होत आहे. जेएचएम इंटरस्टेट या जगभर ४०० हॉटेल्स असलेल्या कंपनीने गुलमर्ग येथे सहा स्टार हॉटेल बांधले असून ते नोव्हेंबरमध्ये खुले होणार आहे. अन्य बड्या हॉटेल चेन्सनीही द्रास, कारगिल व लेहमध्ये हॉटेल्स उभारणी सुरू केली आहे. त्यामुळे काश्मीरमधील तरूणांनाही मोठ्या प्रमाणावर नोकर्‍या उपलब्ध होऊ लागल्या असून आणखी काही वर्षे अशीच शांतता येथे राहिली तर जम्मू काश्मीर पुन्हा एकदा सुवर्णकाळ पाहू शकेल असे येथील उद्योग व्यवसायिक सांगत आहेत.

Leave a Comment