कर्जवसुलीसाठी ‘किंगफिशर’च्या मालमत्तेची विक्री

मुंबई,  दि. ६ – गेल्या काही वर्षात वाढलेल्या तब्बल ७,५०० कोटींच्या कर्जाची वसुली करण्यासाठी १७ बँकांच्या समूहाने किंगफिशर एअरलाइन्सच्या मुंबई आणि दिल्लीत स्थावर मालमत्ता विक्री  करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनीची मोठी कोंडी झाली असून, आधीच वैमानिकांच्या संपाने अडचणीत असलेल्या किंगफिशरला कर्ज देणार्‍या बँकांनी दणका दिला आहे.

कंपनीला सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील १७ बँकांनी कोटयवधींची कर्जे दिली आहेत. यातील अनेक बँकांची कर्जे कंपनीकडून गेल्या जानेवारीपासून थकीत आहे. कर्जफेड होत नसल्यामुळे बँकांनी कर्जवसुलीसाठी मालमत्तेची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीची मुंबई, दिल्ली, बंगळूरु या प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता आहे. तसेच गोव्यामध्ये कंपनीचे प्रमुख विजय मल्ल्या यांचा बंगलादेखील आहे. यातील दिल्ली आणि मुंबईतील मालमत्तेची विक्री  करून १२० कोटी वसूल करण्याचा बँकांचा विचार आहे. यानुसार १७ बँकांच्या समूहाने एचडीएफसी बँकेला या मालमत्तांचे बाजार मूल्य निश्चित करण्यासाठी नियुक्त केले आहे.

थकित कर्जाबाबत नुकताच बँकांचे अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक झाली होती. मात्र, यामध्ये कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही, यामुळे बँकांकडून मालमत्ता विक्री  करण्याचा विचार केला जात आहे. अंधेरीमध्ये असलेल्या किंगफिशर हाउस विक्री केल्यास ९० कोटी आणि गोव्यातील बंगल्याची विक्री  केल्यास ३० कोटी मिळतील, असा बँकांना अंदाज आहे. मालमत्तेची विक्री  केल्यास कर्जबाजारी असलेल्या किंगफिशरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

दरम्यान, मुंबईत किंगफिशर हाउस रिकामेच असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने नवीन कार्यालयामध्ये स्थलांतर केल्यानंतर या मालमत्तेचा कर्जफेडीसाठी विचार करावा, असे बँकांना कळवण्यात आले असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. बँकांसोबतच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित असलेल्याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मालमत्ता तारण ठेवण्याबरोबर कंपनीचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांनीही बँकांना कर्जाबाबत वैयक्तिक हमी दिली असल्याचे कंपनीने सांगितले.

कंपनीवरील कर्जाचा आकडा ७,५०० कोटींच्या घरात आहे. कंपनी सुरू झाल्यापासून अद्याप एकाही तिमाही कंपनीला नफा झालेला नाही. सातत्याने होणार्‍या तोटाही कर्जाच्या रकमेएवढा झाला आहे. यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती आणखी खालावली आहे.

कर्मचार्‍यांचे वेतनही रखडलेले
तोट्यामध्ये चाललेल्या किंगफिशरमधील कर्मचार्‍यांना गेल्या काही महिन्यांपासून वेतनही मिळालेले नाही. थकलेले वेतन मिळण्यासाठी कंपनीतील वैमानिकांनी संप केला असून, यामुळे कंपनीची विमानसेवा काही प्रमाणात कोलमडली आहे. तसेच भाडयावर घेतलेल्या विमानांचे भाडेही थकवल्यामुळे मालक कंपनीने विमाने ताब्यात घेतली आहेत.

१५ दिवसांची मुदत
कर्जफेड करण्यासाठी कंपनीचे महसूल वाढणे आवश्यक आहे. विमानसेवा सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात बँकांनी कंपनीला १५ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीमध्ये कंपनीला सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना सादर कराव्या लागणार आहेत.

बँकांची कर्जे             
बँक                कर्ज (कोटी रुपयांत)
भारतीय स्टेट बँक        १,४००
पंजाब नॅशनल बँक          ७००
बँक ऑफ बडोदा              ५००
आयसीआयसीआय          ४३०