अंधेरीत सापडला ’फिल्मी बॉम्ब’

मुंबई, दि.४ – मुंबईतील अंधेरीतल्या इन्फिनिटी मॉलजवळ काही वेळापूर्वीच बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. मात्र सापडलेली वस्तू बॉम्ब नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ’तो’ बॉम्ब तिथे ठेवण्यात आला होता असे समजते.

अंधेरीतील इन्फिनिटी मॉल असलेल्या या भागात जवळजवळ ३० प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि फिल्म प्रॉडक्शन हाऊसेस आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रिकरण होत असते. आज ज्या भागात बॉम्ब सदृशवस्तू आढळून आली, त्या ठिकाणीसुद्धा गेल्या सात दिवसांपासून चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे. आज त्या भागात बॉम्ब सीन चित्रित होणार होता. त्यामुळे नकली बॉम्ब तिथे ठेवण्यात आला होता.

मात्र बॉम्ब सदृश वस्तू असल्याची बातमी वार्‍यासारखी या परिसरात पसरली. या बातमीमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये धावपळ उडाली होती. संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला होता. शिवाय बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही वेळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र हा बॉम्ब चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ठेवण्यात आल्याचे आता स्पष्ट झाल्यामुळे नागरिकांबरोबरच पोलिसांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.

Leave a Comment