मंदीतही निस्सानची मोटर सुसाट

नवी दिल्ली दि.४- वाहनक्षेत्राला सध्या ग्रासलेल्या मंदीचा कोणताही परिणाम निस्सान मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर झाला नसून त्यांनी जूनमध्ये आपल्या विक्रीत तब्बल १५५ टक्के वाढ नोंदविली आहे. जूनमध्ये कंपनीने ४१६१ गाड्यांची विक्री केली आहे. गतवर्षी या काळात हीच विक्री १६३२ गाड्या इतकी होती.

भारतात अनेक दिग्गज वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या विक्रीत झालेली घट पाहून उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला असतानाच निस्सानने मारलेली भरारी विशेष कौतुकाची ठरली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक इशीता ताकायकी याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की आमच्या निस्सान सनी सेदान आणि निस्सान मायक्रा हचबॅक या गाड्यांना ग्राहकांकडून फारच उत्तम प्रतिसाद मिळाल्याने आम्ही १५५ टक्कयांची वाढ नोंदवू शकलो आहोत. आता आमची नागरी वापरासाठी अतिशय योग्य अशी इलेव्हिया ही नवी गाडी लवकरच भारतीय बाजारात लाँच होत असून ती साधारण दिवाळीच्या सुमारास बाजारात दाखल होईल. या गाडीमुळे आमच्या उत्पादनात अनेक व्हरायटी ग्राहकांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेली थोडी खीळ व त्यामुळ आलेल्या मंदीतही आम्ही विक्री वाढवू शकलो यामागे ग्राहकांचा आमच्या उत्पादनांवर असलेला विश्वास कारणीभूत आहे;

कंपनीचे मार्केटिंग व विक्री विभागाचे संचालक नितीन टिपणीस म्हणाले की हॉवर ऑटोमोटीव्ह इंडिया ही निस्सानची भारतातील सहयोगी कंपनी असून कंपनीच्या वाढलेल्या विक्रीमागे निस्सानच्या उत्पादनांची गुणवत्ता, ग्राहकांचा विश्वास आणि समाधानकारक विक्री पश्चात सेवा कारणीभूत आहे. आमची नवी इलेव्हियाही अशीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी आमची खात्री आहे.

Leave a Comment