फातीश मेहमूद सौदीकडून भारताच्या ताब्यात ?

नवी दिल्ली दि.२- दिल्ली आणि बंगलोरच्या पोलिसांना स्फोटप्रकरणात हवा असलेला आणि नुकताच सौदीत पकडला गेलेला फातीश मेहमूद याला पुढच्या आठवड्यापर्यंतच भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. फातीशच्या हस्तांतरणाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली असल्याचेही सांगण्यात आले  आहे.

मूळचा बिहारचा असलेला फातीश २०१० मध्ये बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडिअममधील स्फोटात बंगलोर पोलिसांना हवा आहे. तसेच दिल्लीतील जामा मशिदीतील गोळीबार प्रकरणात फातीश दिल्ली पोलिसांना हवा आहे. सुरक्षा संस्थांतील वरीष्ठ अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार फातीश याच्याकडून इंडियन मुजाहिद्दीनच्या अनेक वरीष्ठ नेत्यांची माहिती मिळू शकणार आहे. इतकेच नव्हे तर रियाझ भटकळ तसेच इक्बाल भटकलविषयीही त्याच्याकडे खूप माहिती आहे. त्यामुळेच त्याला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली असून त्याचा ताबा मिळाला तर अनेक बॉम्बस्फोटांच्या तपासात प्रगती होऊ शकणार आहे.

फातीशची पत्नी निकत परवीन हिने मात्र फातीश निरपराध असून आपण त्याच्यासोबत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. ही केस लवकर संपू दे असे सांगतानी ती म्हणते की फातीश खरोखरच दोषी असले तर त्याला शिक्षा द्या पण नसेल तर त्याची त्वरीत सुटका करा. १०-१५ वर्षे त्याला नुसत्या चौकशीच्या नावाखाली तुरूंगात डांबू नका.