गॉड पार्टिकल आणी ब्रह्मांड

जेनेवा, दि. ५ –  या सृष्टीची निर्मिती कशी झाली?, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यात यश आले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. जगातील सर्वात मोठ्या सर्न प्रयोगशाळेत हा शोध लावण्यात आला आहे.

विश्वनिर्मितीशी पौराणिक आणि धार्मिक गोष्टींचा संबंध नसल्याचे, यावरून स्पष्ट होणार असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

`सर्न’मध्ये गॉड पार्टिकलचा शोध मागील दहा वर्षापासून सुरू आहे. यासाठी एटलास आणि सीएमएस नावाच्या दोन महत्वाच्या प्रयोगशाळा तसेच जगभरातील शास्त्रज्ञ गॉड पार्टिकलचा शोध घेत आहेत.

गॉड पार्टिकलला विज्ञानाच्या भाषेत हिग्स बोसॉन म्हणतात. या पार्टिकलमुळेच जगात ब्रह्मांडात तारे, ग्रह आणि चंद्राची निर्मिती झाली. यामुळे गुरूत्वाकर्षण शक्ती तयार झाली. ज्यात दोन अणूंचा संयोग होऊन नव्या कणांची निर्मिती होते.

यामुळे विज्ञानामुळे हे सिद्ध होतेय की, ब्रह्मांडाची निर्मिती ही ईश्वराने नाही, तर भौतिक शास्त्राच्या नियमांनुसार काम करणार्‍या, गॉड पार्टिकल म्हणजेच हिग्स-बोसॉनमुळे झाली आहे.

कहाणी गॉड पार्टिकलची
गॉड पार्टिकलची निर्मिती १४ अब्ज वर्षापूर्वी झाली असल्याचे सांगण्यात येते, ज्यावेळी ब्रह्मांडाचा जन्म होत होता. उर्जेचा महास्फोट झाल्याने १४ अब्ज वर्षापूर्वी सुरूवातीला कणांची निर्मिती झाली. या कणांचा गुण-धर्म ठरवण्यासाठी सुरूवातीला काही अज्ञात कणही अस्तित्वात आले, ते कण म्हणजे सिंग टॉप क्वार्क आणि हिग्स बोसॉन.


भौतिक शास्त्राच्या सिद्धांतानुसार हिग्स-बोसॉनच्या अस्तित्वाने पदार्थातील कणांना वजन आले. पण हिग्ज-बोसॉनमध्ये एवढं रहस्य दडलेय की, शास्त्रज्ञांनी गॉड पार्टिकलला देव कण नाव देऊन टाकले आहे.

या ब्रह्मांडाची रचना गॉड पार्टिकलशिवाय शक्य नाही. कारण गॉड पार्टिकलने वेगवेगळ्या अणूंना आपसात जोडून नव्या असंख्य पदार्थांची निर्मिती केली.

या ब्रह्मांडाचे आणि संपूर्ण सृष्टीचे रूप जे आम्हाला दिसून येतेय ही गॉड पार्टिकलची देणगी आहे. गॉड पार्टिकल जेवढा महत्वाचा आहे. तेवढं त्यामागे रहस्यही दडले आहे. कारण या गॉड पार्टिकलच्या खाणाखूणा दिसून आल्या पण समोर काहीही दिसून आले नाही. पण एवढ्या दिवसाच्या अथक परिश्रमानंतर गॉड पार्टिकल पाहिले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

हिग्ज बॉसन म्हणजे काय?
बिग बँग स्फोटामुळे १३.७ अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची उत्पत्ती झाल्याचे मानण्यात येते. याच बिग बँग स्फोटातील अदृश्य क्षेत्रांमध्ये ‘हिग्ज बॉसन’ आढळत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. गेल्या काही वर्षांपासून हे कण भारित का असतात, याचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘लार्ज हायड्रॉन कोलायडर’ या प्रकल्पाच्या संशोधकानी, अशा कणांच्या अस्तित्त्वाचे संकेत मिळाले होते. आता विश्वाची निर्मिती कशी झाली, याचा शोध घेण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न असेल. ‘हिग्ज बॉसन’च्या अस्तित्त्वाचा शोध लावणे हा पदार्थ विज्ञानातील सर्वात मोठे कोडे असल्याचे मानले जात आहे.

जेव्हा काही कणांचा ‘हिग्ज’ सोबत सामना होतो, त्यावेळी या कणांचा वेग कमी होउन त्यांना वस्तुमान प्राप्त होते. येथूनच ग्रह तारे निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु झाली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. यामुळेच ‘हिग्ज बॉसन’ सारख्या कणांचा शोध हा या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
`लार्ज हायड्रॉन कोलायडर’ या प्रकल्पावर आतापर्यंत दहा अब्ज डॉलर खर्ची पडले आहेत. या प्रकल्पात जगातील सर्वात वेगवान कणांची निर्मिती करण्यात यश आले आहे. हे कण प्रोटोनशी प्रचंड वेगाने टक्कर देतील आणि त्यानंतर जी क्रिया घडेल, त्यातून विश्वाच्या निर्मितीचे रहस्य उलगडेल, असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

हिग्ज सिद्धांत पहिल्या प्रथम प्रा. पीटर हिग्ज यांनी १९६० च्या दशकात मांडला होता. जीनिव्हा येथील कार्यक्रमात हिग्ज यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या शोधानंतर त्यांनीही आनंद प्रकट केला. ते म्हणाले, की चाळीस वर्षांपूर्वी आपण या सिद्धांतावर जेव्हा काम सुरू केले होते, त्यावेळी आपल्या जीवनात हे शक्य होईल, असे आपल्याला वाटले नव्हते.

सोप्या शब्दात ’गॉड पार्टिकल’
प्रश्‍न : गॉड पार्टिकल आहे तरी काय?
उत्तर : गॉड पार्टिकलचे शास्त्रीय नाव `हिग्ज बोसॉन’ असे आहे, सृष्टीची रचना याच कणामुळे झाली. म्हणून या कणाला गॉड पार्टिकल असे म्हणतात.

प्रश्‍न : गॉड पार्टिकलचा शोध महत्वाचा का आहे?
उत्तर : गॉड पार्टिकलच्या शोधामुळे ब्रह्मांडाची निर्मिती आणि सुष्टीची रचना कशी झाली हे समजणार आहे.

प्रश्‍न : गॉड पार्टिकलच्या शोधामुळे मानवाच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे?
उत्तर : गॉड पार्टिकलच्या शोधामुळे ज्ञान-विज्ञानाचे नवे दरवाजे उघडणार आहेत आणि ब्रह्मांडाशी आपले नाते आणि त्याविषयीची माहिती मिळणार आहे.

प्रश्‍न : गॉड पार्टिकलचा शोध कसा घेतला जात आहे?
उत्तर : गॉड पार्टिकलचा शोध फर्मी लॅब, टेवेट्रॉन आणि सर्न सारख्या पार्टिकल कोलायडर मशीनचा वापर करून अणुंना वेगळे करून घेतला जात आहे.

प्रश्‍न : गॉड पार्टिकलच्या शोधामुळे जगाला काही धोका आहे का?
उत्तर : नाही, गॉड पार्टिकलच्या शोधामुळे जगाला कोणताही धोका नाही, मागील दहा वर्षापासून हा शोध सुरू आहे, हा शोध पूर्णपणे सुरक्षित आहे.

Leave a Comment