सेल्स सुपरवायझर

sales

व्यवस्थापनाच्या पदव्या किंवा पदविका प्राप्त केलेले विद्यार्थी व्यवस्थापन विषयक कामांमध्ये जमेल ती जबाबदारी स्वीकारत असतात. मात्र काही विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नेमक्या कोणत्या पदावर काम करायचे आहे याचा निर्णय आधीच घेतात. सेल्स सुपरवायझर हे असे एक व्यवस्थापनातले करिअर आहे. अनेक कंपन्यांमध्ये सेल्स मॅनेजर असतात, परंतु हे सेल्स मॅनेजर कंपनीच्या विक्रीच्या व्यवहाराचे धोरण ठरवणे एवढेच काम करत असतात. विक्री विभागात कार्यरत असलेल्या विक्री प्रतिनिधींच्या कामावर लक्ष ठेवणारा आणि देखरेख करणारा मधलाच एक माणूस असतो. त्याला सेल्स सुपरवायझर असे म्हटले जाते. विक्री प्रतिनिधी भरपूर मिळतात, विक्री व्यवस्थापकही खूप असतात. परंतु सेल्स सुपरवायझर म्हणून ठरवून करिअर करणारे उमेदवार म्हणावे तसे मिळत नाहीत. म्हणून अनेक कंपन्यांमध्ये योग्य सेल्स सुपरवायझरचा शोध नेहमी जारी असतो. डिबीएम किंवा एमबीए या पदव्या घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदावर नेमले जाऊ शकते. त्याच्याकडे चांगले संवाद कौशल्य, नियोजन करण्याची क्षमता आणि केलेल्या नियोजनाप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक ते कौशल्य असण्याची गरज असते.

रूरल मार्केटिंग, ब्रँड मॅनेजमेंट, प्रायसिंग, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या विषयांची चांगली जाणकारी असणारा पदवीधर सेल्स सुपरवायझर म्हणून चांगलाच यशस्वी होऊ शकतो. आपल्या हाताखालच्या विक्री प्रतिनिधींना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या कामात येणार्‍या अडचणी सोडवणे या कामात त्याला रस असला पाहिजे. विक्रीचे धोरण ठरवणारा विक्री व्यवस्थापक आणि प्रत्यक्षात विक्री करणारे विक्री प्रतिनिधी यांच्यातील दुवा म्हणून त्याला काम करावे लागते. त्याला विक्री व्यवस्थापकांचे धोरण तर नीट समजले पाहिजेच, पण विक्री प्रतिनिधींच्या अडचणी सुद्धा नीट कळल्या पाहिजेत.

सर्वसाधारणत: व्यवस्थापन शास्त्रातील पदविका धारण करणारा विद्यार्थी मनुष्यबळ विकास विषयक ज्ञानाच्या आधारावर चांगला सेल्स सुपरवायझर होऊ शकतोच, पण केवळ सेल्स सुपरवायझर्सचे अभ्यासक्रमही आहेत. कोणत्याही विषयातील पदवी धारण करणार्‍या विद्यार्थ्यांना तामिळनाडूतील प्रीस्ट युनिर्व्हसिटीमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. या विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र पुण्यात सुद्धा आहे.