हैद्राबाद दि.४- ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून तुरूंगात असलेले आंध्राचे वायएसआय काँग्रेस नेते जगनमोहन रेड्डी यांचा जामीन आज म्हणजे बुधवारी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. सीबीआयने या प्रकरणात ३ जुलै रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. जगनमोहन कडप्पा मतदारसंघाचे खासदार असून त्यांच्यावर यापूर्वी तीन आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
जामीन मिळण्यासाठी जगनमोहन यांचे वकील राम जेटमलानी यांनी २१ जूनला अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ व २८ तारखेला युक्तीवाद करण्यात आले. जेठमलानी यांनी जगनमोहन सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच राजकीय पक्षाचे नेते असल्याचे सांगून सीबीआयच्या तपासात पूर्ण सहकार्य करतील असे न्यायालयाला सागितले होते..
मात्र सीबीआयच्या वकीलांनी जगनमोहन हे आंध्रात फारच प्रभावशाली असल्याने ते साक्षीदारांवर दबाब आणू शकतात त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये न्यायालयात प्रतिपादन केले होते. जगनमोहन यांच्या केसमधला अजूनही काही तपास बाकी आहे असेही सांगण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने जगन यांचा जामीन नामंजूर केला.
जगनमोहन यांना २७ मे रोजीच अटक करण्यात आली असून तेव्हापासून ते तुरूंगातच आहेत. मात्र तरीही त्यांनी आंध्रात विधानसभा व लोकसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकांत आपले १५ आमदार व दोन खासदार निवडून आणण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या आई विजयालक्ष्मी रेड्डी या आमदार खासदारांसह पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्या असून तेथे त्या या केसमध्ये पंतप्रधानांनी मध्यस्ती करावी अशी विनंती त्यांना करणार आहेत असे समजते.