मंत्रालय आग – महसूल, वन विभाग जास्तीत जास्त फायली मिळविणार

मुंबई दि.३- मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीतून महसूल, वन तसेच नागरी विकास खात्याच्या सुमारे ११० फायली परत मिळविण्याचे प्रयत्न पुरातत्त्व विभागाच्या सहाय्याने यशस्वी होताना दिसत आहेत. चौथ्या, पाचव्या मजल्यावर असलेल्या या कार्यालयातील फायली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावरही त्यातून सुमारे ९ हजार कागदपत्र वरळी डेअरीच्या जागेत गेले आठवडाभर सुकविण्याचे काम सुरू आहे. त्यातून ११० फायली परत मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पुरातत्त्व विभागाच्या संचालक सुप्रभा आगरवाल यासंबंधी अधिक माहिती देताना म्हणाल्या की मंत्रालयाच्या आगीत कांही कागदपत्रे अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहेत तर कांही पाण्यात भिजली आहेत. ही सर्व कागदपत्रे वरळी डेअरी येथे हलविण्यात आली असून महसूल, वन आणि नागरी विकास मंत्रालयांनी या फायली जतन करण्यासाठी आमचे सहकार्य पूर्वीच मागितले होते. त्यानुसार आता या बचावलेल्या कागदपत्रांचे फ्युमिकेशन करण्यात येणार असून त्यानंतर त्याचे स्कॅनिंग करायचे, मायक्रोफिल्मिंग करायचे की डिजिटायजेशन करायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पाण्यात भिजलेले प्रत्येक पेपर टीपकागदावर वाळविण्यात आले आहेत त्यावर थोडी रासायनिक प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पुरातत्त्व विभागाकडे २५ स्कॅनर असून दररोज तीन हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग करणे शक्य आहे. फ्युमिगेशनसाठी एकावेळी २५च फायली पाठविल्या जात आहेत कारण या प्रक्रियेला सहा ते सात दिवस लागतात. फ्युमिगेशनमुळे कागदाला फंगस लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.

महसूल व वनविभागाचे प्रमुख सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सर्व उपलब्ध कागदपत्रांचे सॉरटिंग करून ते जतन करण्यात येणार असल्याचे सागितले आहे तसेच ज्या नागरिकांची कागदपत्रे आमच्याकडे आहेत त्या राज्यभरातील सर्व नागरिकांना, त्यांच्याजवळील संबंधित कागदपत्रे अथवा त्याच्या कॉपीज संबंधित सरकारी अधिकार्‍यांकडे आणून देण्याचे आवाहनही करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment