सुबक नक्षीकाम, एकावर एक नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरुंचे दुर्मीळ शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग अशी वैशिष्ट्ये असणारे पुण्यातील पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिराला २७४ वर्ष पूर्ण झाले आहेत.

पेशव्यांनी ऑक्टोबर १७३६ मध्ये या मंदिराची पायाभरणी केली होती. त्याच्या पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी नर्मदेवरून आणलेल्या शिवलिंगाची येथे स्थापना करण्यात आली. या मंदिरासाठी पेशवे दरवर्षी १ हजार ३५७ रुपये अनुदान देत होते. याशिवाय शिवरात्रीला हजार रुपये व सोने दिले जात होते, असा उल्लेख इतिहासात आढळतो अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक्रम मंदार लवाटे यांनी दिली.
मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवारात असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत. अन्य मंदिरांमध्ये किर्ती मुख उंबरठयावर असतो. पण, ओंकारेश्वर मंदिरामध्ये किर्ती मुख कळसामध्ये आहे. मधल्या कळसामध्ये असलेल्या मोकळया जागेला `ताली’ असे म्हटले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे गुप्त बैठका होत असत. महर्षी व्यास, दत्तगुरु, दोन सिंह व चार साधूंची शिल्पे कळसामध्ये कोरण्यात आली आहे. मंदिरामध्ये गेली ५० वर्षे दर सोमवारी चक्क्याची पूजा बांधली जाते. वैशाखामध्ये चंदनाची पूजा व शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते. तर गुढीपाडवा, दिवाळीमध्ये पेशवेकालीन मुखवटा आणि पोषाखाने देवाला सजवले जाते.