कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट

construction

आपल्या जीवनात बांधकाम हा विषय आता महत्वाचा झालेला आहे. घरे, सदनिका, रस्ते, पूल, भुयारी मार्ग, उड्डाण पूल आणि बोगदे यांच्या कामांना सध्या प्रचंड वेग आलेला आहे. या सगळ्या कामांतून किती प्रकारचा रोजगार निर्माण होऊ शकतो, यावर ओझरती नजर टाकली तरी आश्‍चर्य वाटते. नळ कनेक्शन फिट करणार्‍यांपासून आर्किटेक्टपर्यंत अनेक करिअर संधी या व्यवसायात निर्माण झालेल्या दिसतात.

यासर्व करिअर्स तर आहेतच; पण बांधकामाचे व्यवस्थापन नावाचा नवा प्रकार उदयाला आला आहे. त्यामध्ये तीन प्रकारचे करिअर आहेत. बिल्डींग बांधण्यातील व्यवस्थापन, रस्त्यांसारख्या कामांचे व्यवस्थापन आणि विशेष प्रकारच्या बांधकामांचे व्यवस्थापन. त्यातील रस्ते, पूल, बोगदे अशा बांधकामांचे व्यवस्थापन एखादा सिव्हिल इंजिनिअर करू शकेल, परंतु विशेष बांधकामे आणि घरांचे बांधकाम यांच्या व्यवस्थापनात सिव्हिल इंजिनिअर शिवाय आणखी एक असा माणूस लागतो की जो बांधकामाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट करत असतो. अशा बांधकामांसाठी विविध प्रकारचे परवाने मिळविण्यापासून सुरुवात होते.

घराच्या बांधकामातील सगळ्या प्रकारचे कारागीर मिळवणे आणि त्यांच्याकडून व्यवस्थित कामे करून घेणे हे अशा व्यवस्थापकाचे काम असते. काम केल्यानंतरही त्याची जबाबदारी संपत नाही. वापर परवाना मिळवून देणे हेही त्याचेच काम असते. म्हणजे बांधकाम परवान्यापासून वापर परवान्यांपर्यंत त्याचे विविधांगी काम चाललेले असते. हे काम पूर्ण वेळचे असते. दगदगीचे असते आणि अनेक वेळा ते धोक्याचे सुद्धा असते. या सर्वांना तोंड देऊन हा व्यवस्थापक चांगल्या प्रकारचे बांधकाम करून घेत असतो. दगदग सहन करण्याची ताकद त्याच्यात असली पाहिजे आणि वेळेकाळाचे भान विसरून काम करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. या व्यवसायामध्ये कंत्राटदाराच्या सोबत सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणारा माणूस पुढे कन्स्ट्रक्शन मॅनेजर म्हणून आपले करिअर करू शकतो.

कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट नोकरी म्हणूनही करता येऊ शकते आणि स्वतंत्र व्यवसाय म्हणून सुद्धा करता येऊ शकते. कल्पक आणि धडपड्या लोकांना कसल्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेविना या व्यवसायात नशीब काढता येते.

Leave a Comment