आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर राज ?

मुंबई दि.३- युद्धात प्रेमात आणि आता राजकारणात सगळेच क्षम्य असते असे म्हणतात. शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे जणू याची प्रचीतीच देत आहेत. युवा सेनेने गेल्याच आठवड्यात शाळांच्या १०० मीटर परिसरात सिगरेट तंबाखू विकणार्‍या दुकानांवर, टपर्‍यांवर बंदीची कारवाई करण्याची आरोळी ठोकली होती आणि सगळ्यात पहिला हल्ला केला गेला तो शिवाजी पार्क परिसरातील बाल मोहन शाळेजवळ असलेल्या शारदा पान भंडारवर.

पण अंदरकी बात अशी की हे दुकान या परिसरात गेली चाळीस वर्षे आहे आणि मुख्य म्हणजे याच दुकानातून राज ठाकरे यांना सिगरेटचा पुरवठा केला जातो. उद्धव आणि राज यांच्यातील शत्रूत्व आता सर्वज्ञात आहे आणि आदित्य हे उद्धव यांचे चिरंजीव आहेत इतकेच सांगितले म्हणजे पुरे.

युवासेनेचे समाधान सावरकर यांनी मात्र नियमावर बोट ठेवून हे दुकान बालमोहन विद्यामंदिरापासून १०० मीटरच्या आत असल्याने कारवाई केल्याचे सांगितले आहे तसेच शाळा व्यवस्थापन, पालकांच्या या संबंधात तक्रारी आल्याची पुस्तीही जोडली आहे. मात्र शाळेचे मुख्याध्यापक यादव यांनी युवासेनेकडे कोणतीच तक्रार कधीच केली नसल्याचा खुलासा करताना हे दुकान गेली चाळीस वर्षे इथे आहे असे सांगितले आहे.

शारदा पान भंडारचे मालक सांगतात की मी १८ वर्षाचा होतो तेव्हापासून हे दुकान चालवितो. आता मी ५३ वर्षाचा आहे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आम्ही पूर्ण काळजी घेतो असे सांगून ते म्हणाले की आमच्याकडे येणारे गिर्‍हाईकही पारंपारिक असून पान खाऊन  सिगरेट ओढण्यासाठीच ते येतात. आता सिगरेट विक्री बंद केल्याने पान खाण्यासाठी येणारे गिर्‍हाईकही कमी झाले आहे परिणामी व्यवसायात नुकसान होते आहे.

मनसेने मात्र याप्रकारावर चुप्पी बाळगली असली तरी एकाएकी ही कृती कशाकरता केली गेली या बाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. चाळीस वर्षे हे दुकान येथे आहे याची कल्पना त्यांना नव्हती काय असाही सवाल करण्यात आला आहे.

Leave a Comment