नवी दिल्ली, दि. ४ – एखाद्या रेल्वेच्या डब्यांप्रमाणे कॉंग्रेस पक्षाने नेहरू-गांधी कुटुंबाच्या मागे का जावे? राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी होत असताना दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी व्यक्त केलेली वरील प्रतिक्रियांसह पक्षातील अनेक बाबींचा उहापोह, कॉंग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या `अ ग्रेन ऑफ सँड इन द अवरग्लास ऑफ टाइम’ हे आत्मचरित्रात करण्यात आला आहे. त्यांच्या निधनानंतर हे आत्मचरित्र आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
नरसिंह राव यांची प्रतिक्रिया आणि त्यांनी केलेल्या सूचनेनंतर, राजकारणाचा विद्रूप चेहरा आपल्याला दिसला. तेव्हाच एकूण राजकारणाचा आपल्याला उबग आला होता.
अर्जुनसिंह यांचे हे पुस्तक हे हाऊस इंडिया या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. एकूण ३८३ पानांच्या या आत्मचरित्राचे अशोक चोप्रा हे सहलेखक आहेत. ते म्हणाले, की हे आत्मचरित्र लिहीत असतानाच अर्जुनसिंह यांचे गेल्या वर्षी ४ मार्चला निधन झाले. त्यामुळे या चरित्राकडे `काम चालू आहे’ या भावनेतूनच पाहिले पाहिजे. या पुस्तकातील काही मोकळ्या जागा भरून काढण्याची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली होती आणि आपल्या समजुतीनुसार आपण ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या मोकळ्या जागा भरून काढण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि सहकार्यांच्या अनेक भेटी घेतल्यानंतरच त्या संदर्भातील लिखाण केले.
सिंह यांनी पुस्तकात म्हटले आहे, की सोनिया गांधी यांची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्यानंतर, नरसिंह राव काही काळ शांत राहिले आणि नंतर रागाने उसळले आणि म्हणाले, कॉंग्रेस पक्षाने नेहरू-गांधीरूपी इंजिनामागील डब्यांमागे फरपटत का जावे? अन्य काही पर्यायच नाही का? राव यांच्या संतापामुळे आपली वाचाच बसली, पण आपण मौन राखले.
त्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे तत्कालीन खजिनदार सीताराम केसरी यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि सोनिया गांधी यांना अध्यक्षपद दिल्यासच सर्व बाबी नीट जुळतील असा निष्कर्ष काढला. आपण अवेळी आणि अवास्तव बोललो आणि नेहरू-गांधी कुटुंबाविषयीची भावना स्पष्टपणे जाहीर केली, याची राव यांना नंतर जाणीव झाली, असेही सिंह यांनी चरित्रात म्हटले आहे.