रिलायन्सची समुद्राखालून केबल

अम्मान दि.२- इराकच्या संयुक्त सहकार्याने भारतातील टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील अग्रणी कंपनी रिलायन्स समुद्राखालून केबल टाकणार असून रिलायन्स ग्लोबल कॉम या उपकंपनी कडे हे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे इराक जगातील अन्य देशांशी ब्रॉडबँड तसेच टेलिकम्युनिकेशनने जोडला जाणार आहे. त्यात मध्यपूर्व. आशिया, युरोप, उत्तर अमेरिका यांचा समावेश आहे.

रिलायन्स ग्लोबल कॉम ही समुद्राखालून केबल टाकण्याचे काम करणारी जगातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. ६५ हजार किलोमीटरची केबल यात टाकण्यात येत असून त्यासाठी समुद्रातच लँडींग स्टेशन उभारले जाणार आहे. या स्टेशनला दोन डायव्हर्ट रूटही असून हे रूट इराकच्या फाल्कन अंडर-सी फायबर ऑप्टिक केबल नेटवर्कला जोडले जाणार आहेत. इराक आमच्या जागतिक नेटवर्कच्या माध्यमातून उर्वरित जगाशी जोडला जाणार आहे असे रिलायन्स ग्लोबल कॉमचे सीओओ रोरी कोल यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीचे हे इराकमधले पहिलेच नेटवर्क आहे.

तीस दशलक्ष लोकसंख्या असलेल्या इराकमध्ये अमेरिकेने २००३ साली केलेल्या कारवाईपासून विकासाचा वेग जवळजवळ थांबलाच आहे. सध्या केवळ तीन टक्के लोकच इंटरनेट कनेक्ट आहेत. अपुर्‍या प्राथमिक पायाभूत सुविधा तसेच जादा दर आणि सुरक्षेचा प्रश्न हे इंटरनेट प्रसारातील मोठे अडथळे आहेत. मात्र असे असले तरी मध्यपूर्व, युरोप आणि आशिया एकमेकांशी जोडण्यास इराकचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. इराक यात कम्युनिकेशन ब्रिज म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो असे सांगून कोल म्हणाले की इराकलाही तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या पलिकडे जाऊन अर्थ, प्रसार माध्यमे या क्षेत्रात प्रगती करावयाची आहे. आणि त्यासाठी जलद इंटरनॅशनल कनेक्शन असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच रिलायन्स ग्लोबल कॉमने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

Leave a Comment