मोबाइल ऍप्सचे हवाई उड्डाण

मुंबई, दि. ३ – हातोहाती दिसणार्‍या स्मार्टफोनची संख्या वाढत चालल्याने विमान कंपन्यांची मोबाइल ऍप्समधील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाइल ऍप्सनी हवाई वाहतूक उद्योगातील विक्री व मार्केटिंगच्या पध्दतींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. येत्या दोन वर्षांत भारतात ८५ टक्के तिकिटविक्री मोबाइलद्वारे होईल, तर मोबाइलद्वारे चेक – इन करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत पाचपटीने वाढ होईल, असा अंदाज आहे. जगभरात ९३ टक्के विमान कंपन्यांनी येत्या तीन वर्षांत मोबाइल ऍप्सना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.

हवाई वाहतूक व दळणवळण क्षेत्रातील सिटा या संस्थेने अलीकडेच १०० हून अधिक विमान कंपन्यांच्या आधारे केलेल्या जागतिक सर्वेक्षणात मोबाइल ऍप्सचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्याचप्रमाणे कापा या संस्थेने अलीकडेच सादर केलेल्या अहवालातही भारतातील प्रवासी सुविधांमध्ये मोबाइलसेवांचा विस्तार कसा होणार आहे, त्याचा वेध घेण्यात आला आहे. इंटरनेटवर वेबसाइटवर विमान तिकिटांचे बुकिंग, विमानसेवांची माहिती या सर्व सेवांचा लाभ सध्या मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. सोशल नेटवर्किंग साइटस हेही प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचे चांगले माध्यम ठरत आहे. त्याच्या जोडीनेच आता मोबाइलचा वापरही वेगाने वाढत आहे. स्मार्टफोन वापरणार्‍यांपैकी ७१ टक्के जण फोनद्वारे ऑनलाइनबुकिंग करू शकतात, तर साध्या फोनच्या बाबतीत हे प्रमाण ५१ टक्के इतके असते.

उड्डाणापूर्वीच्या माहितीसंदर्भातही प्रवासी आता मोबाइलचाच वापर अधिक करतील. मोबाइलवरून प्रवाशांना कोणती माहिती सर्वाधिक हवी असेल, याबाबत सिटाने एक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळले की, ७७ टक्के प्रवाशांना उड्डाणांविषयी माहिती हवी असते. ५० टक्के प्रवाशांना सुरक्षा तपासणीस किती विलंब लागेल, ते जाणून घ्यायचे असते. ४० टक्के जणांना बाहेर पडण्याच्या मार्गापर्यंत जाण्यास किती वेळ लागतो, त्याची माहिती हवी असते, तर २१ टक्के लोक विमानतळाच्या परिसरातील वाहनतळांविषयी चौकशी करीत असतात. उड्डाणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मोबाइलचा वापर करण्याचे प्रमाण सध्या ५१ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांवर गेले आहे.

मोबाइल ऍप्सनी हवाईवाहतूक उद्योगातील विक्री व मार्केटिंगच्या पध्दतींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यामुळेच पुढील तीन वर्षात ३५ टक्के विमान कंपन्या मोबाइल ऍप्समधील संशोधन व विकासावर लक्षणीय खर्च करणार आहेत.

Leave a Comment