कर्ज उचलले शंभर कोटी मात्र हप्ता दोनशे कोटींवर!

औरंगाबाद,२ जुलै-महापालिकेचे अधिकारी कर्जापोटी शंभर कोटी रुपये हातात पडले असताना, हप्ता मात्र दोनशे कोटी रुपयांच्या हिशेबाने ठरवला गेल्याने चक्रावले आहेत. दोनशे कोटी रुपयांवरील कर्जासाठी मुद्दल व व्याज भरा, असे पत्र आयडीबीआय बँकेने महापालिकेला पाठवल्यामुळे कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.

महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या वीज बिलाची थकबाकी एकरकमी भरण्यासाठी आणि समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेच्या प्रशासनाने आयडीबीआय बँकेकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर केला.
आयडीबीआय बँकेने महापालिकेच्या मालकीची सव्वातीनशे कोटी रुपये मूल्य असलेली जमीन तारण ठेऊन घेऊन पालिकेला दोनशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.

मात्र, यापैकी शंभर कोटी रुपये पालिकेला बँकेला दिले आहेत. उर्वरीत शंभर कोटी रुपयांचे कर्ज पालिकेने अद्याप उचललेले नाही. असे असताना आयडीबीआय बँकेने महापालिकेला एक पत्र पाठवले. दोनशे कोटी रुपयांचे मुद्दल आणि व्याज असे मिळून तीन कोटी ६५ लाख रुपयांचा हप्ता भरा असे बँकेने पालिकेला कळवले आहे.

बँकेने दोनशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल असले, तरी महापालिकेने शंभर कोटी रुपयांचेच कर्ज उचलले आहे. त्यामुळे दोनशे कोटी रुपयांचा हप्ता का भरायचा, असा प्रश्न पालिकेच्या अधिकार्‍यांसमोर निर्माण झाला आहे. कर्ज मंजूर करताना महापालिका व बँक यांच्यात झालेला करार नेमका काय होता याबद्दल पालिकेत आता चर्चा सुरू झाली आहे.

पालिकेच्या लेखा विभागाने हे पत्र विधी विभागाकडे पाठवले आहे. आता विधी विभाग यावर काय सल्ला देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोनशे कोटी रुपये कर्जासाठी तीन कोटी ६५ लाख रुपयांचा हप्ता भरा असे सांगणारे आयडीबीआय बँकेचे पत्र मिळाले आहे. हे पत्र आम्ही विधी विभागाकडे पाठवले आहे. त्या पत्राबाबत विधी विभागाचे मार्गदर्शन घेणारच आहोत. मात्र, हप्ता मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम नव्हे, तर उचलेल्या कर्जाची रक्कम गृहित धरून निश्चित झाला पाहिजे, असा अभिप्राय मी लिहीला आहे.- अशोक थोरात, मुख्यलेखाधिकारी, महापालिका.

Leave a Comment