वाहतूक कोंडी सोडविणारी जादूई कार

लंडन- वाहतूक कोंडीत तासनतास कधी फसला आहात? प्रचंड वर्दळ असलेल्या द्रुतगती महामार्गावरही अनेक वेळा मागेपुढे जराही हलायला जागा नाही अशी परिस्थिती असते हा आता प्रवाशांचा नित्याचा अनुभव होतो आहे. एखाद्या ठिकाणी आपल्याला तातडीने पाहोचायचे आहे पण महामार्गावर वाहतूक अडली आहे याचा अनुभवही आता नवा राहिलेला नाही. अशावेळी एखाद्या उडत्या गालिचासारखी किंवा आपल्या जेम्स बाँडच्या कारसारखी आपलीही गाडी सुसाट वेगाने बाहेर पडू शकली तर काय मजा येईल असा विचारही मनात आला असेल. मग तुमच्या मनातली ही इच्छा आता लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नामवंत कार उत्पादक कंपनी फोर्ड ने हे आव्हान स्वीकारले असून त्यासाठीचे तंत्रज्ञानही तयार केले आहे. हे तंत्रज्ञान वापरून त्यांची संबंधित गाडीच्या जर्मनीत तसेच अमेरिकेत चाचण्याही घेतल्या आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी ती त्या अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत.

हे तंत्रज्ञान विकसित करणार्‍या अभियंत्यांच्या चमूमधील जोसेफ उरूआ याच्या मते हे तंत्रज्ञान वापरल्याने कारचा वापर पूर्ण क्षमतेने होऊ शकणार आहेच पण नको असलेल्या वाहतूक कोंडीत अडकण्याचे प्रमाणच कमी होऊ शकणार आहे. त्याशिवाय प्रवासाचा वेळ वाचेल ते वेगळेच ! काय आहे हे तंत्रज्ञान?

या तंत्रज्ञानात कारमध्ये रडार आणि कॅमेर्‍याचा वापर केला गेला आहे. ज्या महामार्गावरून तुम्ही जात आहात त्या मार्गावरची वाहतूक स्थिती आणि वाहतुकीचे विश्लेषणही तुम्हाला एका क्षणात मिळू शकणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त एक बटण दाबायचे आहे. ट्राफिक जॅम असिस्ट असे या यंत्रणेला नांव देण्यात आले असून सिग्नल आणि ब्लॅक बॉक्स मार्फत ही माहिती संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तुम्ही बटण दाबले की कारचा ताबा ही यंत्रणा घेणार आहे. रस्त्यावर असलेले अडथळे जाऊन कारची दिशा बदलायची सोयही त्यात आहे. सध्या ही यंत्रणा फक्त द्रुतगती महामार्गांसाठी बनविण्यात आली असली तरी लवकरच शहरी वाहतुकीसाठीही ती वापरली जाऊ शकणार आहे. त्यासाठी एकच करायचे. ही यंत्रणा असलेली गाडी घ्यायची आणि गाडी मिळण्यासाठी किमान पाच वर्षे वाट पाहायची. कारण हे तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने विकसित करण्यासाठी तितका अवधी लागणार आहे .

Leave a Comment