रेशमाचे मूलभूत प्रकार (रेशमाची गोष्ट भाग २ )

silk2

रेशीम हा किटकजन्य धागा आहे. त्याच्या मुख्यत्वे दोन जाती. एक जंगली आणि दुसरी मुद्दाम पैदास केलेली किवा जोपासलेली जात. जंगली जातीत रेशीम किडे तुतीशिवाय अन्य झाडांवर वाढतात आणि रेशीम कोश तयार करतात. हे रेशीम सर्वसाधारणपणे  तपकिरी रंगाचे आणि अतिशय मजबूत असते. भारतात सुरवातीला याच रेशमाचा वापर केला जात असे. आजही केला जातो. हे ’टसर सिल्क’ या नांवाने ओळखले जाते. जपानमध्ये याच रेशमाला वाईल्ड सिल्क म्हणून ओळखले जाई. जपानमध्ये आता रेशीम उत्पादन पूर्णपणे बंद झाले असल्याचे समजते.

तुतीच्या झाडांवर किडे पाळून त्यापासून मिळविलेले रेशीम हे आज सर्वाधिक प्रचलित आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाणारे रेशीम आहे. सेरिकल्चर या उद्योगाला शासनाकडूनही अनेक प्रकारची मदत केली जात असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेशीम किडे पालनाचा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करत आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण देणार्‍या खास संस्थाही आहेत.

या दोन प्रकारांशिवाय अन्य दोन प्रकारही अस्तित्वात आहेत. ते म्हणजे इरी आणि मुगा सिल्क. याचा अर्थ असा की  रेशमाचे एकूण चार प्रकार आहेत आणि या चारही प्रकारचे रेशीम उत्पादन करणारा भारत हा एकमेव देश आहे. इरीलाच इंडी-इरंडी असेही नांव आहे. यात रेशमाचे किडे एरंडीच्या पानंावर वाढतात. बिहार, बंगाल, ओरिसा,आसामच्या पूर्वेकडे हे सिल्क उत्पादन होते. मुगा सिल्क ही मात्र खास आसामची खासियत. सुगंधी झाडांच्या पानांवर हे रेशीमकिडे वाढतात. त्यातून निघणारे रेशीम अतिशय उच्च प्रतीचे, सोनेरी रंगाचे, अतिशय तलम आणि म्हणून मौल्यवानही आहे.

मुगा सिल्क ही आसामची खास परंपरा, संस्कृती आहे. विशेष म्हणजे आसामी वधूसाठी याच रेशमापासून विणलेली साडी वापरायची पद्धत असून ही साडी वधूने स्वतःच विणायची असते.

कोश काढून पाण्यात टाकून जो रेशीम धागा मिळविला जातो, तो जाडीला सगळीकडे सारखा नसतो. त्यामुळे दोन,चार धागे एकत्र करून त्यापासून घट्ट,मजबूत धागा तयार केला जातो.एक मीटर कापड विणण्यासाठी साधारणपणे पंचवीसशे ते तीन हजार कोश लागतात.त्याच्या रंग, पोतावरून त्याची वर्गवारी केली जाते.

Leave a Comment