नितांतसुंदर श्रीकालहस्ती

Sri_Kala_Hasti

तिरूपतीपासून अगदी जवळ म्हणजे ३६ किमीवरच असलेल्या या शिवमंदिराला अवश्य भेट द्यावी असे हे स्थळ आहे. अगदी आपला देवाधर्मावर विश्वास नसला तरीही ज्या काळात कोणतीच यांत्रिक साधने उपलब्ध नव्हती तेव्हाही आपल्याकडची गगनाला गवसणी घालणारी ही भव्य मंदिरे कशी बांधली गेली असतील, काळ्या पाषाणात ही अभूतपूर्व शिल्पे कशी कोरली गेली असतील हे मुद्दाम पाहण्यासाठी तरी ही देवळे पाहायलाच हवीत. श्रीकालहस्ती हे वायुलिंग स्वरूपातील शंकर मंदिर आहे. दाक्षिणात्य स्थापत्यशैलीप्रमाणेच अतिप्रचंड आवारातील हे भव्य मंदिर आहे.
tmp
आपल्याकडे साधारण कोणत्याही देवळाच्या उभारणीमागे कांही तरी आख्यायिका असते. तशी ती येथेही आहे. श्री कोळ्याने या लिंगावर जाळे विणले, काल नावाच्या सर्पाने या लिंगाच्या डोक्यावर मणी ठेवला आणि हस्ती नावाच्या हत्तीने सोंडेने पाणी आणून लिंगावर अभिषेक केला. हे तिघेही शिवभक्त होते. या मंदिरातील ज्योत सतत थरथरत असते कारण वारा या लिंगावरून सतत वाहतो. या शिवलिंगात राहू आणि केतू आहेत आणि असे भारतातले हे एकमेव शिवलिंग आहे असेही सांगितले जाते.

या मंदिरात अनेक भाविक वेगवेगळे नवस फेडायला येत असतात. असेही सांगितले जाते की या मंदिरात पावलाला पाऊल लावून तीन प्रदक्षिणा घातल्या तर आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते. अनेक भाविक मंदिराभोवती लोटांगण घालतही प्रदक्षिणा घालतात. या बहुदा नवसाच्या असतात. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनीही या मंदिराला भेट दिल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. मंदिरात त्यांच्या वेळांप्रमाणे सतत पूजा, पालख्या सुरूच असतात. वाजंत्री वाजवत काढलेल्या या पालख्या पाहणे हाही आनंदाचा भाग असतो. त्यात सौंदर्यापेक्षा मानवी मनाचा भाबडेपणाच आपल्या हृदयाला अधिक भिडतो. तिरूपती नंतर बहुतेक जण या मंदिराची वारी करतात आणि असेही सांगितले जाते की या मंदिरातून दुसर्‍या मंदिरात अथवा अन्य कोठे न जाता सरळ घरीच परतायचे असते.

तिरूपती गावापासून टॅक्सी, बसेस या गावाला जातात तसेच कालहस्ती रेल्वे स्टेशनही आहे. राहण्याच्या सोयींविषयी अधिक माहिती नाही कारण बहुतेक येणारे लोक दर्शन घेऊन लगेचच तिरूपतीला अथवा अन्य ठिकाणी जातात. महाशिवरात्री दिवशी प्रचंड गर्दी असते.

Leave a Comment