आषाढी एकादशी सोहळ्यास ८ लाखाहून अधिक भाविक

पंढरपूर, दि.१-आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला येण्याचा संदेश पांडुरंगांनीच भक्तांना दिल्याचे या अभंगातून श्रीसंत नामदेव महाराज सांगतात. वर्षानुवर्षे राज्याच्या कानाकोपर्‍यातून येणारे वैष्णवजन आषाढी एकादशीला पंढरीत विठोबारायाचे दर्शन घेण्यासाठी येतात.

                      आषाढी कार्तिकी भक्तजन येती |
                      चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ॥
                      दर्शन हेळामात्र तया होय मुक्ती |
                      शवासी नामदेव भावे ओवाळीती ॥

शनिवारी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे ८ लाख भाविक पृथ्वीवरच्या या वैकुंठनगरीत मोठ्या उत्साहाने दाखल दाखल झाले असून, भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये  पवित्र स्नान करून श्रीविठ्ठलाचे दर्शन घेतले. श्रीविठ्ठलाच्या जय घोषाने व टाळ, मृदुंगाच्या गजरात पंढरी अक्षरशः दुमदुमुन गेल्याचे दृश्य मन तृप्त करीत होते.

पंढरीत दाखल झालेल्या संतांच्या पालख्यांनी शनिवारी श्रीसंत ज्ञानेश्‍वर, श्रीसंत तुकाराम यांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालून नगरप्रदक्षिणा केली. विविध संतांच्या पालख्या पहाटे ४ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत नगरीत प्रवेश करीत होत्या. पालख्यांमध्ये म्हटले जात असलेले अभंग व टाळ, मृदुंगाच्या गजराने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. सी.सी. टीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातूनही यात्रेवर नजर ठेवली जात होती. दर्शन रांग सुमारे १२ किलोमीटर लांबवर गेली होती. दर्शनासाठी भाविकांना जवळजवळ २२ तास रांगेत उभे रहावे लागत होते. दर्शन रांगेतील भाविकांना श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती व पंढरपूर नगरपरिषद यांच्या वतीने पाणी, आरोग्य सुविधा, चहा व फराळाच्या साहित्याचे वाटप सुरू होते.

यावर्षी संतांच्या दिंड्यांबरोबरच स्वच्छता दिंडी अशा विविध दिंड्या सामील झाल्या होत्या. या सोहळ्यासाठी लाखो भाविक येत असल्याने जनजागृतीचे कार्यही काही सामाजिक संस्था करीत होत्या.

शासनाने यावर्षी मानाच्या पालख्यांबरोबरच इतर संतांच्या पालख्यांनाही सोयी सुविधा दिल्या होत्या. त्यामुळे भाविकात आनंदाचे वातावरण होते. पंढरीत आलेल्या भाविकांनी श्रीसंत कैकाडी महाराज, श्रीसंत तनपुरे महाराज, ताकपीठे विठ्ठोबा, गोपाळपूर येथे दर्शनासाठी गर्दी केली होती.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अनेक मंत्री श्रीविठ्ठलाच्या महापुजेसाठी आल्यामुळे मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते पोलिसांनी पहाटे ४ वाजेपर्यंत बंद ठेवल्यामुळे भाविकांची गैरसोय झाली. महाद्वार, चौफाळा येथे चेंगराचेंगरीची घटना घडल्या. यावर्षी पहिल्यांदाच २ तास रस्ते बंद ठेवण्यात आल्यामुळे पोलिस अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले.

Leave a Comment