आदर्शप्रकरणी अशोक चव्हाण यांचे विलासराव देशमुखांकडे बोट

मुंबई,दि.३०- आदर्श सोसायटी जमीन वाटपाचे अधिकार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे होते, असा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी केला.

अशोक चव्हाण यांनी मुंबईत चौकशी आयोगासमोर ही साक्ष दिली आहे. याप्रकरणी साक्ष देताना चव्हाण म्हणाले, की जमीन वाटपाचे अधिकार त्यावेळी महसूल खात्याकडे नव्हते, तर मुख्यमंत्र्यांकडेच होते. आदर्शच्या इमारतीला मंजुरी दिल्याप्रकरणी विलासरावांनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवताच आता अशोक चव्हाणांनीही आपला रोख विलासरावांकडे वळवला आहे.

आदर्श इमारतीला मंजुरी मिळाली तेव्हा अशोक चव्हाण हे तत्कालीन महसूल मंत्री होते, आणि घोटाळा जेव्हा उघड झाला त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. याच घोटाळ्यामुळे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आदर्श घोटाळाप्रकरणात सुशील कुमार शिंदे यांनी विलासरावांकडे बोट दाखवलं होतं, मग विलासरावांनी अशोक चव्हाणांचं नाव घेतलं. तर आता अशोक चव्हाणांनी विलासरावांकडे रोख वळवला आहे.

Leave a Comment