अमेरिकेत महाभयंकर वणवा- दीड लाख एकर जंगल भस्मसात

वॉशिंग्टन दि.३०- अमेरिकेच्या पश्चिमेकडील कोलोरॅडो राज्यात दोन ठिकाणी लागलेल्या महाभयंकर वणव्यात दीड लाख एकरावरील जंगल जळून खाक झाले असून दोन शहरातील अनेक घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्रीय संकट जाहीर केले असून फेडरल सरकारने तातडीची मदत व मदतनिधी या राज्याकडे पोहोचता करण्याचा निर्णय घेतला आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. या राज्याशिवाय अन्य चाळीस ठिकाणीही असे वणवे पेटले आहेत असेही समजते.

कोलेरॅडो राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर असलेल्या स्प्रिंग ला ही आगीची मोठीच झळ पोहोचली असून त्यात साडेतीनशेहून अधिक घरे आगीच्या लपेट्यात येऊन राख झाली आहेत तर चार लाखांहून अधिक घरांना आगीची पुसटशी झळ लागली आहे. या भागातून सुमारे ३० हजार पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या आगीत १८ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पवर्तरांगात सुरू झालेला हा वणवा शहरापर्यंत पोहोचल्याची ही पहिलीच घटना असल्याचे समजते. पर्वतराजीतील १८ हजार ५०० एकर वनसंपदाही जळून राख झाली आहे. सततच्या प्रयत्नांनंतरही आगीवर आत्तापर्यंत १५ टक्केच काबू मिळविता आला आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत अमेरिकेत अशा आगी लागतात. स्प्रिंगज प्रमाणेच डेनेव्हर शहरातील २५७ घरे आगीच्या चपेट्यात आली असून येथील सुमारे ८७ हजार एकर जंगल जळून गेले आहे. मात्र येथील आगीवर बर्‍यापैकी नियंत्रण मिळविता आले आहे. या दोन शहरांशिवाय मोंटाना, उटाह, डेकोटा, न्यू मेक्सिको, अॅरिझोना, व्योमिग, आणि कॅलिफोर्निया जंगलातही वणवे लागले असल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्राध्यक्ष ओबामा कोलोरॅडोला आज भेट देण्याची शक्यता आहे.

Leave a Comment