लंडन पोलिसांचा असांजेला शरण येण्याचा आदेश

लंडन दि.२९ – विकिलिक्सचा संस्थापक जुलियन असांजे याला लंडन पोलिसांनी शरण येण्याचा आदेश दिला असून असांजेने मात्र शरणागती पत्करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. असांजे याने सध्या इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासात आश्रय घेतला असून त्याला दूतावासात असेपर्यंत पोलिस अटक करू शकत नाहीत असे समजते. गेले नऊ दिवस असांजे या दूतावासात आहे आणि लंडन पोलिसांनी या दूतावासातच त्याला पत्र पाठवून शरण येण्यास फर्मावले आहे.

याविषयी माहिती देताना मेट्रोपोलिटन पोलिसांनी सांगितले की या दूतावासात आश्रय घेतलेल्या व्यक्तीने आम्ही सांगू तेथे आणि सांगू त्या वेळी शरण यायला हवे. या चाळीस वर्षीय व्यक्तीचे नांव आम्हाला माहिती नाही पण स्वीडनला या व्यक्तीचे हस्तांतरण करावयाचे आहे व त्यासाठी त्याने आमच्या स्वाधीन होणे आवश्यक आहे.

असांजे याच्यावर दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा व त्यांचा लैंगक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून असांजेच्या म्हणण्यानुसार हे आरोप खोटे आहेत. केवळ राजकीय हेतूने त्याला यात अडकविले गेले आहे. असांजेला डिसेंबर २०१० मध्ये स्वीडनच्या विनंतीवरून लंडन येथे अटक करण्यात आली होती. त्याने त्यावेळी जामीनावर सुटका करून घेतली मात्र त्याचवेळी न्यायालयाकडे त्याने स्वीडनला आपले हस्तांतरण करू नये यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर असांजे याने इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला असून इक्वेडोरचे अध्यक्ष त्यावर विचार करून निर्णय घेणार आहेत.

Leave a Comment