पंढरपूरची आषाढीची यात्रा आज असून पंढरपुरामध्ये भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र आणि तामिळनाडू अशा पाच राज्यातले भाविक पंढरपुरात आषाढीला येत असतात. अशा प्रकारचे तीर्थक्षेत्र भारतात अन्यत्र कोठेही नाही. सध्या पंढरपुरात तीन लाख लोक जमलेले आहेत.
देहू येथून निघणारी तुकाराम महाराजांची दिंडी आणि आळंदीहून निघणारी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरजवळ आलेली आहे. या दोन्हीही मुख्य पालख्या उद्या सकाळी पंढरपुरात पोचतील. त्याशिवाय अन्य संतांच्याही पालख्या या पंढरपूरच्या टप्प्यात आलेल्या आहेत आणि त्याही उद्या या पावन नगरीत प्रविष्ट होतील. आजच पंढरपुरामध्ये तीन लाख भाविक येऊन दाखल झालेले आहेत. देहूच्या दिंडीतले दोन लाख आणि आळंदीच्या पालखीतले तीन लाख असे पाच लाख लोक आणि छोट्या-मोठ्या दिंड्यातील लाखभर लोक उद्या पंढरपुरात दाखल होतील. म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी या पंढरीमध्ये सुमारे दहा लाख लोक दाखल झालेले असतील.
पंढरपूरच्या यात्रेचे एक वैशिष्ट्य असे की, तिचे आणि तिच्यात घ्यावयाच्या विठ्ठलाच्या दर्शनाचे महत्व केवळ एकादशी या एकाच दिवशी आहे. अन्य यात्रांमध्ये तीन-तीन चार-चार दिवस दर्शन घेतले तर चालते. पंढरपुरात एक तर गर्दी प्रचंड आणि दर्शनाचा दिवस एकच. त्यामुळे तिथली गर्दी अभूतपूर्व असते. इथे दर्शनाला येणारे वारकरी अतिशय साधेभोळे शेतकरी आणि मोठ्या संख्येने अशिक्षित असतात. त्यामुळे त्यांचा देवाचे दर्शन घेण्याच्या बाबतीत फार मोठा अट्टाहास नसतो. आपल्यालाच आधी दर्शन मिळावे म्हणून ते कसले गैरप्रकार करत नाहीत. रांगेत उभे राहतात. भक्तांची रांग फार लांबवर जाऊ नये म्हणून दर्शन मंडप उभारण्यात आलेला आहे. या दर्शन मंडपामुळे हजारो भाविकांची रांगेतल्या हालअपेष्टांपासून सुटका होते. परंतु तरी सुद्धा हा मंडप भरूनही पाच-सहा कि.मी. लांब रांग लागलेली असते. या रांगेमध्ये हे भाविक अतीशय शिस्तीत उभे असतात. गर्दी गडबड करत नाहीत, ढकलाढकली करत नाहीत. पाऊस पडला तरी रांग मोडत नाहीत. त्यामुळे दहा लाख लोक येऊन सुद्धा त्यांचे नियंत्रण करण्यासाठी फार मोठा पोलीस फाटा नेमावा लागत नाही. भाविक स्वत:च शिस्त पाळणारे असल्यामुळे पोलिसांवर येऊ पाहणारा ताण टळतो.
बिचारे भाविक फार अपेक्षा बाळगत नाहीत. काही भाविक तर श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा आग्रह न धरता केवळ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन परत जाणे पसंद करतात. म्हणून काही प्रमाणात दर्शन बारीतली गर्दी कमी होते. हे सगळे खरे असले तरी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समिती फारसा प्रयत्न करत नाही, असे आढळले आहे. सरकारने इथल्या सगळ्या सोयी कराव्यात, अशी अपेक्षा सतत व्यक्त केली जाते. सरकार आपल्या परीने बरेच काही करण्याचा प्रयत्नही करते. परंतु त्या सगळ्या सोयी समाधानकारक आणि पुरेशा असतातच असे नाही. पंढरपूरमध्ये कायम वास्तव्यास असलेले काही संत आणि महाराज आपापले मठ बांधून आहेत. अशा मठांमध्ये बर्याच लोकांची उतरण्याची आणि अन्य सोयी होऊ शकतात. त्याशिवाय पंढरपुरातल्या घराघरांमध्ये परंपरेने राहणारे काही वारकरी असतात. त्यांच्या सोयी होतात. परंतु असंख्येने भाविकांना खूप गैरसोयी सहन कराव्या लागतात. त्याबाबतीत मंदिर समिती काहीच करताना दिसत नाही. एका माहितीनुसार मंदिर समितीचे २४ कोटी रुपये बँकांमध्ये पडून आहेत. त्यावर व्याज मिळत असेल, परंतु मंदिर समिती हा काही व्याज कमावण्याचा उद्योग नाही. त्यामुळे त्या पैशावर व्याज मिळते, त्याचे कौतुक करण्याची गरज नाही. हा पैसा भाविकांचाच आहे. त्यामुळे त्यातून भाविकांच्या राहण्याच्या सोयी स्वस्तात करण्याची गरज आहे.
शेगांव, शिर्डी या तीर्थक्षेत्रांचे महत्व पंढरपूरसारखेच वाढत चालले आहे. पण या तीर्थक्षेत्रातील मंदिर समित्यांनी भाविकांच्या मुक्कामाच्या स्वस्त सोयी केलेल्या आहेत. तशा पंढरपूरच्या मंदिर समितीने केल्या पाहिजेत. शिर्डी, शेगाव येथील सोयी किंवा तिरुपती येथील सुविधा, स्वच्छता यांच्याशी पंढरपूरच्या सोयींची तुलना केली तर फारच खेदजनक चित्र समोर उभे राहते. पंढरपुरात प्रचंड अस्वच्छता असते. ती कशी कमी करता येईल यावर अजून म्हणावा तसा विचारही झालेला नाही आणि त्याची अमलबजावणीही झालेली नाही. पाच राज्यातल्या भाविकांचे येणे आणि वर्षभरात विविध यात्रांमधून पन्नास लाख भाविकांचा पंढरपुरात होणारा वावर याचा विचार केला तर केंद्र सरकारने पंढरपूरच्या विकासासाठी प्रचंड निधी देण्याची गरज आहे. पण तसा फार प्रभावी प्रयत्नही होत नाही आणि केंद्र सरकार सुद्धा त्या दृष्टीने काही हालचाल करत नाही. शिर्डी येथे लवकरच भाविकांच्या सोयीसाठी १५ हजार खोल्यांचे बांधकाम होणार आहे. याचा आदर्श पंढरपूरच्या मंदिर समितीने समोर ठेवला पाहिजे.