आमिर खानची सरकारबरोबर २०० कोटींची डील?

नवी दिल्ली, दि. ३० – `सत्यमेव जयते’ या कार्यक्रमानंतरही आमिर खानचे जनजागृती अभियान सुरु राहणार आहे. स्टार प्लस या वाहिनीवर `सत्यमेव जयते’ या कार्यक्रमानंतर आमिर खानचे प्रॉडक्शन हाऊस केंद्र सरकारच्या विशेष विनंतीवर लघु चित्रपट तयार करणार आहे.

देशात बालकुपोषण या गंभीर समस्येविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या प्रचार अभियानातल्या तब्बल ५० शॉर्ट फिल्मसची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन करणार आहे.

शॉर्ट फिल्मवर काम सुरु झाले असून या बिग बजेट प्रचार अभियानाला टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांव्यतिरिक्त मोबाईल फोन (एसएमएस)च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

आमिर खानने या अभियानाचा भाग बनण्यासाठी किती मानधन घेतले, असा प्रश्‍न अधिकार्‍यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितले की, या अभियानासाठी आमिर मानधन घेणार नाही. मात्र चित्रपट निर्मितीचा खर्च सरकार करणार आहे. त्यासाठी एक विशिष्ट रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम किती असणार, याबाबत अधिकार्‍यांनी मौन बाळगले असले तरी या सरकारी अभियानाचे बजेट २०० कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रालयाला या अभियानासाठी सरकारबरोबरच यूनिसेफकडूनही आर्थिक मदत मिळाली आहे. यासाठी आमिर खान आणि सरकार यांच्यात करार झाला आहे.

विशेष म्हणजे याआधी आमिरने पर्यटन मंत्रालयासाठी `अतिथि देवो भव’ हे अभियान केले होते. यासाठी आमिरने स्वत: कोणतेही मानधन घेतले नव्हते. मात्र ही जाहिरात आमिरच्याच प्रॉडक्शन हाऊसने तयार केली होती. या जाहिरात निर्मितीसाठी कोटी रुपये आमिरच्या कंपनीला मिळाले होते. `अतिथी देवो भव’ ही जाहिरात तयार करण्यात आमिरला प्रसुन जोशी आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मदत केली होती.

स्टार प्लसवर सुरु असलेल्या ’सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी आमिरच्या कंपनीला प्रत्येक एपिसोडमागे चार कोटी मिळत आहे.

कुपोषणावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीवर काम सुरु असून प्रसुन जोशीसुद्धा या निर्मिती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. येत्या तीन महिन्यात हा अभियान राष्ट्रीय स्तरावर सुर होईल आणि आमिर खानचा सहभाग हा अभियान यशस्वी करण्यात मदत करेल, अशी आशा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

Leave a Comment