करिश्मा काश्मीरचा

नयनमनोहर निसर्ग, उत्तुंग बर्फाच्छादित शिखरे, असंख्य लहान मोठी तळी,सरोवरे, खळाळणार्‍या नद्या, झरे,ओढे, घनदाट गर्द झाडी यांनी नटविलेले पृथ्वीवरचे नंदनवन म्हणजे काश्मीर. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी भेट द्यावीच असे हे सुंदर राज्य. काश्मीरला जायचे म्हणजे उन्हाळ्यात अशी एक सर्वसाधारण समजूत असते. मात्र माझ्या मते काश्मीरला कधी जायचे, याचे उत्तर चान्स मिळेल तेव्हा, असे आहे. प्रत्येक मोसमात वेगळ्याच सौंदर्याने नटणारे आणि आपल्याला मोहित करणारे हे राज्य भारताचे गणराज्य म्हणून १५ ऑगस्ट १९४७ ला उदयाला आले. काश्मीरचे राजे हरिसिंग यांनी भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि हे राज्य भारताचा अविभाज्य भाग बनले.
Kashmir2
या सुंदर राज्याला मधली कांही वर्षे दहशतवादाच्या जीवघेण्या झळा सोसाव्या लागल्या. आजही त्या झळा विझलेल्या नाहीत मात्र आता खूपच निवल्या आहेत. कांही काळापूर्वी हिंदी सिनेमासृष्टीचे शूटिंगसाठीचे आवडते असलेले हे ठिकाण  मधल्या अस्थिरतेच्या काळात जणू वाळीत टाकल्यासारखे बाजूला पडले होते पण आता पुन्हा एकदा काश्मीरमध्ये पर्यटकांची गजबज होऊ लागली आहे. वास्तविक येथे पर्यटक येण्याचा खरा काळ सुरू होतो तो एप्रिलच्या मध्यानंतर. मात्र गेल्या कांही वर्षात पर्यटकांची वर्दळ फेब्रुवारीपासूनच सुरू होते आहे ती अगदी डिसेंबरपर्यंत सुरूच राहते. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या काश्मीरी बांधवांच्या चेहर्‍यावर हास्य विलसू लागले आहे. कारण पर्यटन हाच येथला उपजिविकेचा सर्वात मोठा व्यवसाय आहे.
Kashmir3
श्रीनगर ही जम्मू- काश्मीरची उन्हाळी राजधानी. काश्मीर पाहायचे म्हणजे सर्वात सोयीचे आहे ते श्रीनगरला येऊन येथे मुक्काम करायचा आणि आजूबाजूची पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग, मानसबल, क्षीरदेवी अशी प्रेक्षणीय स्थळे पाहायची. श्रीनगर या सर्व स्थळांच्या साधारण मध्यभागी येते. प्रथम एक दिवस श्रीनगरला राहून पुढचा प्रवासाचा बेत ठरवायचा. सगळीकडे जाऊन आल्यावर मग शांतपणे श्रीनगरला दोन दिवस मुक्काम टाकायचा आणि श्रीनगरही पाहायचे असा आमचा पर्यटनाचा कार्यक्रम होता.
Kashmir1
झेलम नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले श्रीनगर शहर तसे लहान नाहीच. या नदीवरच्या नऊ ऐतिहासिक पुलांमुळे या शहराच्या दोन्ही बाजू जोडल्या गेल्या आहेत . सर्वात मोठी बाजारपेठ येथेच आहे. प्रचंड मोठ्या बागा, शिकारे, हाऊसबोटी, दल सरोवर या लोकप्रिय स्थळांमध्ये आता भर पडली आहे ती नुकत्याच ओपन झालेल्या ट्यूलिप गार्डनची. श्रीनगरला पोहोचताच सर्वात प्रथम दल सरोवराची भेट घ्यायची कारण बहुतेक पर्यटन कंपन्या श्रीनगरच्या पहिल्या मुक्कामात प्रवाशांची सोय हाऊसबोटीतच करत असतात. दल लेक म्हणजे श्रीनगरची नाळ. आणि त्यात शेकडोंच्या संख्येने असलेल्या हाऊसबोटी म्हणजे तरंगते महालच. ब्रिटीश परंपरेनुसार बांधलेले. सेदार लाकडापासून बनलेल्या या १००-१२५ फूट लांबीच्या हाऊसबोटी म्हणजे अनुभवण्याची गोष्ट आहे. आतून सुरेख सजविलेल्या, ओक लाकडावरच्या अप्रतिम कोरीवकामाने नजर खिळवून ठेवलेल्या या बोटी आपला मुक्काम आनंदाचा करतात.
Kashmir4
सायंकाळ उतरताना शिकारा राईडचा अनुभव घ्यायलाच हवा. चार किवा पाच व्यक्ती बसतील असे सुरेख सजविलेले शिकारे दल सरोवरात शेकडोंच्या संख्येने विहरताना दिसतात. तास दीडतासाच्या या सफरीत तरंगती शेते, तरंगती घरे, तरंगता बाजार पाहता पाहता सूर्यास्त कधी होतो हे कळतही नाही. दल सरोवरात तरंगणारे हे शिकारे म्हणजे रंगीबेरंगी पोशाख केलेल्या जलकन्याच जणू. शिकारा सफर सुरू असतानाच शेजारच्या शिकार्‍यातून केशर, सुकामेवा, कपडे, भाजीपाला, रंगीबेरंगी मौल्यवान खड्यांचे दागिने असे अनेक प्रकार विकायलाही आलेले असतात.
Kashmir5
श्रीनगर मध्ये मुघल बादशाहांनी बांधलेल्या प्रचंड मोठ्या बागा पाहण्यासारख्याच. चश्मेशाहीत पाण्याचा जिवंत प्रवाह अहोरात्र खळखळत वाहतो आहे. हे पाणी औषधी असल्याचे सांगण्यात येते. पाणी भरपूर त्यामुळे हिरवळ, विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले, विविध झाडे यांची कमतरता नाहीच. त्यातून हिमालयाच्या पर्वतरांगांची पार्श्वभूमी सगळीकडेच. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला एक सुंदर साज चढतो. चश्मेशाहीप्रमाणेच निशात, शालिमार या बागाही महाप्रचंड. एका दिवसांत दोन बागा फिरायच्या तर पाय दुखून येतात. मात्र अगदी संपूर्ण दिवसही पाहून कंटाळा येणार नाही ती बाग म्हणजे ट्यूलिप गार्डन. काश्मीरी व्हेनिस असेही त्याला म्हणतात. ही फुले मोठीच आकर्षक पण अल्पजीवी. ट्यूलिप्स पाहायचा खरा सीझन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तिसर्‍या आठवड्यापर्यंतच. मग पुन्हा वर्षभर कांही नाही. नाना आकर्षक रगांची अठरा हेक्टर क्षेत्रावर पसरलेली ट्यूलिप्स जणू जमिनीवर पसरलेले गालिचेच. त्याचे वर्णन शब्दात करता येणे कठीणच.
Kashmir8
श्रीनगरपासून थोड्या दूरवर आहे ती शंकराचार्य टेकडी. सुमारे दोनशे पायर्‍या चढून वर गेले की शंकराचे देऊळ आणि शंकराचार्य जेथे साधना करत असत ती छोटीशी गुहा. संपूर्ण दगडी बांधकामाचे हे  मंदिर पाहण्यासारखे तर आहेच पण येथून श्रीनगरचे जे दर्शन होते तेही वेड लावणारेच. तख्त ए सुलेमान या टेकडीवर सुमारे हजार वर्षांपूर्वी शंकराचार्यांची तपस्या केली होती. सनातन हिंदू धर्माची पुर्नस्थापना करण्यासाठी त्यांनी काश्मीरला भेट दिली होती.
Kashmir6
श्रीनगरचा लाल चौक म्हणजे शहराचा मुख्य बाजार. येथे खास काश्मीरी कलाकुसरीचे कपडे, पडदे, गालिचे यांची प्रचंड दुकाने आहेतच पण सुकामेवा, कोरीव कामाच्या वस्तू यांचीही मोठमोठी दुकाने या भागात आहेत. आम्हाला सर्वात नवल वाटले ते याचे की कोणत्याही दुकानात जा, वस्तूवर किमती छापलेल्या नाहीत. एकाच वस्तूची किंमत एकाच दुकानात दोन सेल्समन वेगवेगळी सांगतात. याचाच अर्थ तुमच्याकडे बघून वस्तूची किंमत सांगितली जाते. त्यामुळे खरेदी करताना आपण देतोय ती किंमत योग्य आहे का जादा आहे याचा अंदाजच येत नाही.
Kashmir7
जुने श्रीनगर आणि नवे श्रीनगर अशी या शहराची ढोबळ विभागणी करता येईल.नवे श्रीनगर मोठमोठी हॉटेल्स, मेडिकल कॉलेज, मोठा बाजार आणि आधुनिक इमारतींनी नटलेले आहे तर जुन्या श्रीनगरमध्ये छोटे रस्ते, जुनी पारंपारिक बांधकामांची घरे, गल्लीबोळ पाहायला मिळतात. महंमद पैगंबरांचा पवित्र केस असलेला हजरतबल दर्गाही आवर्जून पाहावा असाच.

Leave a Comment