सोमवारी होणार मंत्रालयात मॉकड्रील

मुंबई, दि. २९ – मंत्रालयात सोमवार दि. २ जुलै २०१२ रोजी संध्याकाळी चार वाजता मॉकड्रीलचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी दिली.
नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव (१) टी.सी.बेंजामिन व मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव श्रीमती आय.ए.कुंदन यांच्या उपस्थितीत मॉकड्रील संदर्भात गुरूवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे संचालक मिलिंद देशमुख, अग्निशमन सेवेतील अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीस २१ जून २०१२ रोजी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपत्कालीन परिस्थितीत कोणती पावले उचलावीत, त्यांच्यात धैर्य व आत्मविश्वास जागृत करुन त्यांना संभाव्य परिस्थितीशी सामना करता यावा तसेच आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचे कार्य अधिक कार्यक्षमतेने व्हावे या दृष्टीकोनातून मंत्रालयात सोमवारी मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर मॉकड्रीलसाठी फील्ड मार्शलची नियुक्ती
मुख्य इमारतीत तळमजल्यावर माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक प्रमोद नलावडे, पहिल्या मजल्यावर सार्वजनिक आरोग्य सचिव भूषण गगराणी, दुसर्‍या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामल कुमार मुखर्जी, तिसर्‍या मजल्यावर उद्योग विभागाचे सचिव के.शिवाजी यांची फिल्ड मार्शल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मॉकड्रीलचे नियंत्रण अधिकारी म्हणून या व्यक्ती काम पाहणार आहेत. मंत्रालयाच्या विस्तार इमारतीत तळमजला, पहिला मजला, पोटमाळ्यासाठी आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ.आर.पी.सागर, दुसर्‍या मजल्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय, तिसर्‍या मजल्यावर सहकार विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, चौथ्या मजल्यावर शिक्षण विभागाचे सचिव संजयकुमार, पाचव्या मजल्यावर माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, सहाव्या मजल्यावर मुख्य निवडणूक अधिकारी देबाशिष चक्रवर्ती तर सातव्या मजल्यावर माहिती तंत्रज्ञान संचालक एस.जाधव फिल्ड मार्शल म्हणून काम पहाणार आहेत.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आगीचा सायरन मुख्य इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागल्याची सूचना हूटरद्वारे (धोक्याची सूचना) देण्यात येईल. फिल्ड मार्शल आणि त्यांच्या नियंत्रणाखाली तीन अधिकारी आपापल्या मजल्यावरील कर्मचार्‍यांना निश्चित केलेल्या जवळच्या मार्गाद्वारे मंत्रालयातून बाहेर पडण्याची व्यवस्था करुन सुरक्षित स्थळी हलवतील. फिल्ड मार्शलचे सहायक आग विझविणारी यंत्रे कार्यान्वित करतील व प्राथमिक उपचार व्यवस्थेची तरतूद करतील. या अधिकार्‍यांकडे असलेल्या यादीतील सर्व लोक मंत्रालयातून सुरक्षित स्थळी पोहचले आहेत का याची खातरजमा करतील. या मॉकड्रीलपूर्वी मंत्रालयातून बाहेर पडण्याचे जे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत तेथे फलक दर्शविण्यात येतील. मंत्रालयाच्या प्रत्येक विंगवर जवळचे बाहेर पडण्याचे मार्ग दर्शविणारा नकाशा लावण्यात येईल. आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी प्रत्येक विभागाकडे संबंधित शासकीय यंत्रणांची यादी तयार ठेवण्यात येईल. फील्ड मार्शलमध्ये आपापसात समन्वय व संवाद उत्तमपणे साधला जावा व मॉकड्रील यशस्वीपणे अंमलात यावी असे अपर मुख्य सचिव टी.सी.बेंजामिन यावेळी म्हणाले.

आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारे पाण्याचे पाईप तसेच बाजारात उपलब्ध असणारे अक्रिलीक पाईप, विशिष्ठ ठिकाणी आवश्यक असणारी वाळू समाविष्ट अथवा पाणी समाविष्ट आग विझविणारी नळकांडी, पब्लिक अड्रेस सिस्टिम, होज रील्स, हायड्रन्टस्, मंत्रालयाच्या आवारातील सुरक्षित जागा याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment