राऊडी राठोड

दाक्षिण्यात्य भाषेतील चित्रपटांचा रिमेक ही गोष्ट आता हिंदी चित्रपट सृष्टीसाठी नविन राहिली नाही. गजनी, दबंग, सिंघम या चित्रपटाच्या यशाने ही लाट आली. दाक्षिणात्य नृत्यदिग्दर्शक प्रभूदेवाने सलमान खानला घेऊन तयार केलेला ‘वॉन्टेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता प्रभूदेवा अक्षयकुमारसोबत ‘राऊडी राठोड’ घेऊन आला आहे.

‘राऊडी राठोड’ ची कथा आहे बिहारमधली. देवगड नावाच्या एका उजाड वस्तीवर बापजी नामक एका व्यक्तीची सत्ता असते. शेतकरी, महिला यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य माणसांमध्येही बापजीची दहशत आहे. भरदिवसा तो महिलांना उचलून घेऊन जातो आणि पोलिस नुसते हातावर हात ठेऊन बघत राहतात. पोलिस इन्स्पेक्टरच्या बायकोला पळविल्यानंतरही तो अधिकारी त्याच्याच वाड्यावर जाऊन आपल्या बायकोला शोधण्याची विनंती करतो. याच देवगडमध्ये सहायक पोलिस अधिक्षक पदावर विक्रम राठोड (अक्षयकुमार) चे आगमन होते. बापजीशी संघर्ष करतांना विक्रम गायब होतो. मुंबईत चोर असलेला शिवा त्याच्यासारखाच दिसणारा असतो, फरक असतो फक्त त्याच्या मिशीच्या स्टाईलमध्ये. शिवा ठग आहे ,मात्र भोंदू नाही. तोही विक्रम सारखाच शत्रूला धुळ चारायला सक्षम आहे.

मागील काही वर्षात जे काही दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक बनविण्यात आले आहेत. त्यातील ‘सिंघम’ अपवाद वगळला, तर सर्वांची पार्श्‍वभूमी उत्तर भारतातील आहे. या चित्रपटाची पार्श्‍वभूमी देखील उत्तर भारताची आहे. सलमानच्या ‘रेडी’ चित्रपटामधील ‘ढिंका चिका’ सारखेच एक गाणे यात आहे, ते म्हणजे ‘चिंताता चिता चिता’ या गाण्यावर वर अक्षयसह दिग्दर्शकानेही ठुमके लगावले आहेत. चित्रपटाच्या पहिल्या दहा मिनिटात हे गाणे येते यावरून आपल्याला एक अंदाज येतो की, चित्रपटामध्ये काय काय पहायला मिळू शकेल.

चित्रपटातील राउडी नायकाचा एक डायलॉग आहे, ‘जो मै बोलता हूं, वो मै करता हूं. जो मै नही बोलता, वो डेफिनेटली करता हूं’, तेव्हा आपल्याला प्रश्‍न पडतो की आपण कॉमेडी चित्रपट बघतोयकी ऍक्शन? मी मृत्यूला घाबरत नाही तर, मृत्यू मला घाबरतो,अशी गर्जना राठोड करतो. जेव्हा तो – लोकांशी एकटा सामना करतो तेव्हा, त्याच्या वरील वाक्याची आपल्याला प्रचिती येते. एका दृष्यात जेव्हा राठोड जखमी होतो, आणि जमिनीवर पडतो तेव्हा आपल्याला वाटते आता सर्व संपले. मात्र, तेव्हा अचानकपणे आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते. पावसाचा पहिला थेंब राठोडच्या चेह-यावर पडतो आणि जोरदार पावसाला सुरुवात होते आणि रजनिकांतलाही धक्का बसावा अशा तर्‍हेने विक्रम गुंडांशी लढतो.

अक्षय शिवा आणि विक्रम या दोन्ही भूमिकेत सारखाच दिसतो. मागील काही वर्षात अक्षयकुमारने बॉक्स ऑफिसवर सपाटुन मार खाल्ला आहे यामुळे त्याची ऍक्टींग थोडी सुधारल्याचे जाणवते. सोनाक्षी सिन्हाच्या वाट्याला फक्त गाण्यावर डान्स करणे एवढीच भूमीका आहे. मागील काही वर्षात येऊन गेलेले अँक्शनपट आणि हा चित्रपट यांचा फॉर्म्युला एकच आहे. प्रेक्षकांना असेच चित्रपट आवडतात. कदाचित हे खरं देखील आहे. मात्र प्रश्‍न हा आहे की, लोकांना यापेक्षा अधिक काही मिळाले तर नको आहे का ? परंतु निर्माता, दिग्दर्शकांना हे कोण सांगणार? चित्रपटाच्या काही भागात मुंबईचा उल्लेख होतो, मात्र बिहार स्टाईल हाणामारी मुळे ही मुंबई आहे का असा प्रश्‍न पडतो. एका ऊजाड गावतला गुंड थेट मंत्र्याला आपल्या हाताखाली ठेवतो. हे कोणत्याही सामान्य व्यक्तिला न पटणारे आहे, मात्र असे प्रश्‍न कथालेखकाला पडत नाहीत यात आपला दोष नाही.चित्रपटातील सर्वच गाणी ठसकेबाज आहेत. थोडक्यात सांगायचे तर डोके बाजुला ठेऊन चित्रपटगृहात जायचे आणि अक्षयचा ‘राउडी’पणा एंजॉय करायचा.

चित्रपट – राउडी राठोड निर्माता – संजयलीला भन्साळी, रॉनी स्क्रूवाला दिग्दर्शक – प्रभू देवा संगीत – साजिद – वाजिद कलाकार – अक्षयकुमार, सोनाक्षी सिन्हा.

चित्रपट रेटिंग – २ १/२ *

Leave a Comment