भारत रशिया सहकार्याने बनलेले ब्रह्मोस-२ लवकरच लष्कराच्या ताफ्यात

मॉस्को दि. २८ – भारत आणि रशिया यांच्यात संयुक्तपणे तयार करण्यात येणारे हायपरसॉनिक ब्रह्मोस-२ हे क्रूझ क्षेपणास्त्र २०१७ पर्यंत लष्कराच्या ताफ्यात सामील होणार आहे. या क्षेपणास्त्राचा वेग सुमारे  ६१२५ किमी. एवढा प्रचंड असणार आहे.

हे क्षेपणास्त्र तयार होण्यासाठी कमीतकमी पाच वर्षांचा कालावधी लागणार असून, त्यादृष्टीने ६.५ माक एवढ्या वेगाने या क्षेपणास्त्रच्या अनेक चाचण्या करण्यात आल्याची माहिती रशिया-भारत संयुक्त ब्रह्मोस एअरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधीकारी शिवथनू पिल्ले यांनी दिली. या क्षेपणास्त्राचा मारा जमीन, आकाश आणि समुद्र अशा तीनही ठिकाणांहून करता येईल, अशा पद्धतीने बनवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या क्षेपणास्त्रच्या वापराची परवानगी भारत आणि रशिया या दोनच देशांना असणार आहे. अन्य देशांना त्याची परवानगी दिली जाणार नसल्याचेही पिल्ले यांनी नमूद केले आहे. सध्या तयार होणार्‍या या क्षेपणास्त्रचा आराखडा रशियाच्या ’एनओपी मशीनोस्त्रोयेनी ३एम५५ याकोन्थ’ या क्षेपणास्त्राच्या आराखड्यावर अवलंबून असेल. सुमारे २९० किलोमीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये असून, प्रसंगी तो ३०० किमीपर्यंत वाढवता येणार आहे.

यापैकी जमीनीवरुन आणि पाण्यातून मारा करणार्‍या क्षेपणास्त्राच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, येत्या वर्षाअखेर पर्यंत हवेतून मारा करणार्‍या क्षेपणास्त्राच्या चाचण्याही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment