बांगलादेशी घुसखोराकडे चक्क आधार कार्ड!

अहमदाबाद, दि. २९ – देशातील अनेक नागरिक एकीकडे आधार कार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे घुसखोरांना मात्र, सुलभपणे आधार कार्ड मिळत असल्याचे दिसत आहे. विशेष सुरक्षा दलाकडून गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या अकबर शेख या घुसखोराकडून पॅन कार्ड आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शेखने पॅन कार्ड काढले असून, त्याचा उपयोग त्याने बँक खाते उघडण्यासाठीही केला होता, असे उघडकीस आले आहे.

अहमदाबादमधील अनेक पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पॅन कार्ड काढल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी एक तक्रार कुबेरनगर येथील रहिवाशाने `जागेगा गुजरात संघर्ष समिती’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर शेख याच्या अटकेमुळे इन्कम टॅक्स विभागाला धोक्याचा इशारा मिळाला आहे. पाकिस्तानी नागरिक अहमदाबादमधील एका करसल्लागाराच्या माध्यमातून पॅन कार्ड काढून घेत असून, काळ्या पैशाचा व्यवहार करण्यासाठी बँक खाती काढत आहेत.

आयकर खात्याच्या नियमानुसार भारतीय अथवा अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिकाने भारतात एका आर्थिक वर्षात सलग १८१ पेक्षाही अधिक दिवस वास्तव्य केल्यास तो पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतो. मात्र काही जणांनी अहमदाबादमध्ये राहत नसतानाही स्वत:ला भारतीय नागरिक म्हणवून घेत पॅन कार्ड काढून घेतले आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. `आमच्याकडे आलेल्या तक्रारींची आम्ही चौकशी करू. जर पॅन कार्ड काढण्यासाठी एखाद्याने बनावट कागदपत्रे दिली असतील, तर त्याच्यावर अथवा तिच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे गुजरातच्या इन्कम टॅक्स विभागाचे मुख्य आयुक्त एम. डी. काबरा यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानातून भारतात अवैधरित्या घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेला इम्रान चिपा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. इम्रानकडे पॅन कार्ड आणि ओळखीसंबंधी अन्य कागदपत्रे सापडली होती. `अनेकदा घुसखोर वाहन परवाना मिळवतात आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी आणि बोगस इन्कम टॅक्स भरण्यासाठी त्याचा वापर करतात. त्यानंतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी ते बँकेचे कर्ज घेतानाही आढळून आले आहे,’  अशी माहिती जागेगा गुजरात संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश कपाडिया यांनी दिली आहे.

Leave a Comment