पाकिस्तानात पुन्हा कधीच जाणार नाही – सुरजित सिंग

इस्लामाबाद दि.२८- आता यापुढे पाकिस्तानात पुन्हा कधीही परत जाणार नाही, असे उद्गार सुरजित सिंग यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना काढले.  लाहोर येथील लखपत कारागृहातून तब्बल तीन दशकांनी सुटका झाल्यानंतर सुरजित सिंग पंजाबी भाषेत पुढे म्हणाला की, दोन्ही देशांतील कैद्यांची सुटका करण्यात यावी. मला हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. आता पुन्हा पाकिस्तानात कधीही परतणार नाही, कारण, माझ्यावर पुन्हा तोच गुन्हा केल्याचा आरोप ठेवला जाण्याची शक्यता आहे.
 
६९ वर्षांचे सुरजित सिंग हे ३० वर्षे पाकिस्तानी कारागृहात होते. ते सकाळी कारागृहाबाहेर पडले तेव्हा चॅनेलवाल्यांनी मुलाखतीसाठी त्याना घेरले. पांढरी दाढी असलेले सुरजित कुटुंबीयांना भेटण्यास उत्सुक आहेत. सीमा ओलांडून भारतात कधी परततोय असे त्याला झाले आहे. त्यांनी २००५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा पूर्ण केली.

पाकिस्तानी अधिकार्‍यांनी सीमेवरील औपचारिकता पूर्ण केल्यावर सुरजित भारताच्या हद्दीत प्रवेश करतील. त्यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक व ग्रामस्थ सीमेपलिकडील अटारी चेकपोस्टनजीक त्यांच्या येण्याची प्रतिक्षा करीत आहेत.

Leave a Comment