नगर जिल्ह्यात `ऍग्रोमार्ट]च्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध

अहमदनगर, दि. २६ – शेतकर्‍यांच्या गरजा लक्षात घेऊन कृषी उपकरणांचे उत्पादन करणार्‍या बंगळुरूच्या रत्नागिरी इम्पेक्स प्रा.लि. या प्रसिद्ध कंपनीच्या `ऍग्रोमार्ट’ या दालनाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक उपकरणे व कुशल तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी इम्पेक्स प्रा.लि. या कृषीपयोगी वस्तू उत्पादक कंपनीच्या ऍग्रोमार्ट या दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिले आऊटलेट अहमदनगर शहरातील आनंदऋषी मार्गाजवळील आनंदधामसमोर सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. रत्नागिरी इम्पेक्स प्रा.लि. या कंपनीचे विपणन संचालक एस.ए. चंद्रमोहन यांच्यासहीत अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, रत्नागिरी इम्पेक्स प्रा.लि.ने सुरू केलेल्या ऍगोमार्ट या वन स्टॉप रिटेलचे महाराष्ट्रातील पहिले आऊटलेट अहमदनगरमध्ये सुरू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी उपकरणे, विक्रीपश्‍चात सेवा या बरोबरच प्रात्यक्षिके व मार्गदर्शनदेखील उपलब्ध होणार आहे. यामुळे कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण होऊन शेतकर्‍यांच्या उत्पादनात मोठी वाढ होणे सहज शक्य होणार आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस शेतमजुरांचा तुटवडा भासत आहे. मजुरीचे दरही शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा स्थितीत कृषी उपकरणांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या गरजेनुसार त्यांना ऍग्रोमार्टच्या माध्यमातून मोठे साहाय्य होणार आहे.

Leave a Comment