धुळ्याच्या महिला महापौरावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हल्ला

मुंबई, दि. २८-  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण, युवती राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी अभियान असे विषय घेऊन राजकारणात महिलांना प्राधान्य देऊ पाहणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ओळख बनते आहे. मात्र धुळे येथील एका माजी नगरसेवकाने धुळ्याच्या महिला महापौर मंजुळा गावित यांना मर्डर नावाच्या एका वृत्तपत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्याची तसेच याच वृत्तपत्रातून त्यांच्यावर अश्‍लील टिपण्णीही करण्याची घटना उघडकीस आली आहे. हे कमी की काय म्हणून, त्याने गावित यांच्या घरावरही हल्ला चढविल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष नीता केळकर यांच्या पुढाकाराने धुळ्यात मोर्चा काढण्यात आला. भाजपाच्या शिष्टमंडळाने याविषयी राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांचीही भेट घेतली. तेव्हा शिंदेविरूद्ध तडीपारीची कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पाटील यांनी दिले होते. मात्र त्यांनी कारवाई मात्र अद्यापही केलेली नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे राज्यभर दौरे करत आहेत. या आठवड्यात त्या धुळ्याचा दौरा करणार आहेत. धुळ्याच्या महिला महापौर मंजुळा गावित यांच्या घरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच माजी नगरसेवक विनायक शिंदे यांनी  प्राणघातक हल्ला करूनही आर.आर. पाटील यांनी अद्याप कारवाई केलेली नाही. उलट ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी त्याला जामीनावर सोडले आहे. गुरूवारी भाजप महिला मोर्चाने शिंदेविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली असून वृत्तपत्रातून अश्‍लील भाषेत धमकी देण्याविरूद्ध प्रेस काउन्सिलकडे दाद मागण्यात येणार आहे, असे केळकर म्हणाल्या. येत्या विधीमंडळ अधिवेशनात भाजप हा मुद्दा लावून धरणार असून राज्याचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे अणि एकनाथ खडसे यांनी आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे.

Leave a Comment