जमशेदपूरचा टाटाचा प्लांट तीन दिवस बंद

जमशेदपूर दि.२८- टाटा मोटर्सचा भारतातील पहिलावहिला प्रकल्प म्हणजे जमशेदपूरचा कारखाना आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार वाहनांची कमी झालेली मागणी आणि तुलनेने अधिक असलेला पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात मध्यम व जड वाहनांची निर्मिती होते.

गेले दोन महिने या दोन्ही प्रकारच्या वाहनांची विक्री घटली असून आर्थिक मंदी त्यासाठी कारण आहे. दोन महिन्यात ही विक्री ११ टक्कयांनी घटली आहे. टेल्को वर्कर्स युनियनचे महासचिव चंद्रभान सिंग यांनीही ही बाब मान्य केली आहे. ते म्हणाले कारखान्यात ५० टक्के ब्लॉक क्लोजर आहे पण कर्मचार्‍यांच्या पगारात अॅडजस्टमेंट करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

मुंबईत मुख्यालय असलेली टाटा मोटर्स ही भारतीय मल्टीनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपनी मोटर वाहन उत्पादनातील जगातील १८व्या नंबरची कंपनी असून प्रवासी कार, व्हॅन ,कोचेस तसेच ट्रकचे उत्पादन या कंपनीत केले जाते.

Leave a Comment