अन्न प्रक्रिया उद्योगाचे आव्हान

जगात सध्या शस्त्र निर्मितीवर सर्वाधिक पैसा खर्च होत आहे. त्या खालोखाल माहिती तंत्रज्ञानाने उलाढाल केलेली आहे. परंतु येत्या काही वर्षामध्ये फुड प्रोसेसिंग म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग हा जगातला पहिल्या क्रमांकाचा उद्योग ठरणार आहे. कारण कितीही झाले तरी माणसाला खायला लागतेच आणि आता तर लोकांचे जीवनमान उंचावल्यामुळे प्रक्रिया केलेल्या अन्नाला त्यांच्याकडून जास्त मागणी यायला लागली आहे. या मागणीने अन्न प्रक्रिया उद्योगाला गेल्या दशकातला सर्वाधिक वेगाने विकसित होणारा उद्योग ठरविले आहे.

घराघरांमध्ये बायका नोकर्‍या करायला लागल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्वयंपाक करण्यास वेळ नाही आणि त्यांच्याकडून प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची मागणी वाढायला लागली आहे. अशा रितीने या उद्योगाला महिलांमुळेच चालना मिळालेली आहे आणि या उद्योगात महिलांनाच मोठी संधी आहे. भारतामध्ये अजूनतरी घरच्या स्वयंपाकाला प्राधान्य देण्याची पद्धत आहे. त्यामुळे भारत ही प्रक्रिया युक्त अन्नपदार्थांची म्हणावी तेवढी आकर्षक बाजारपेठ नाही. मात्र भारतातून अन्नप्रक्रिया उद्योग तयार करण्यास मात्र प्रचंड वाव आहे. सध्या भारताचा फळ, दुग्ध, भाज्या उत्पादनाच्या बाबतीत जगात अव्वल क्रमांक आहे. परंतु या कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यास भरपूर वाव असूनही या उद्योगाला भारतात चालना मिळालेली नाही. मात्र तसे प्रयत्न सुरू झालेले आहेत.

भारतात या उद्योगाला जेवढा वाव आहे त्याच्या दहा टक्के सुद्धा प्रक्रिया केली जात नाही. म्हणजे भारतातला अन्न प्रक्रिया उद्योग आता आहे त्या पेक्षा दसपटीने वाढू शकतो. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या शिक्षणासाठी अनेक संस्था तत्पर आहेत. निरनिराळ्या विद्यापीठातील गृहविज्ञान अभ्यासक्रमांमध्ये अन्न प्रक्रिया हा एक विषय आहे. त्यामुळे गृहविज्ञानाची पदवी मिळवणार्‍या विद्यार्थिनींना अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीची दारे सताड उघडी आहेत. अशा विद्यार्थिंनींना पदवी मिळविल्यानंतर याच विषयात स्पेशलायझेशन करायचे असेल तर त्यासाठी त्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाची संधीही आहे. मात्र आता विविध विद्यापीठांनी अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केलेले आहे.

१२ वी नंतर तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम किंवा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम अशा दोन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध आहे. या क्षेत्रात काही विशेष करू इच्छिणार्‍यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री अभ्यास केला असेल तर त्यांना संशोधक म्हणून उत्तम काम करण्याची संधी उपलब्ध आहे. केंद्र सरकारने कर्नाटकात मैसूर येथे सेंन्ट्रल फुड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सी.एफ. आर. आय.) ही संस्था केवळ याच एका कामासाठी स्थापन केलेले असून अशा प्रकारच्या पंधरा संशोधन संस्था देशभरात कार्यरत आहेत. त्या पंधराही संस्था नवनव्या संशोधकांना आपल्यात सामावून घेण्यास उत्सुक आहेत. या संस्थांमधून पॅकेजड् फुडवर बरेच संशोधन केले गेलेले आहेत. त्याला भरपूर वाव आहे. कारण भारतातून अशा प्रकारचे अन्न पदार्थ परदेशात निर्यात करण्यास भरपूर संधी उपलब्ध आहे.

Leave a Comment