माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा पाया मजबूत – नासकॉम

मुंबई – देशातील आर्थिक स्थिती अनिश्‍चिततेने भरलेली असली, तरी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा (आयटी) पाया मजबूत असल्याने यातून हे क्षेत्र मार्ग काढण्यात यशस्वी होईल. मात्र, याचवेळी पुढच्या दोन तिमाहींमधील या क्षेत्राच्या कामगिरीची वाट पाहावी लागेल असे, `नासकॉम’चे अध्यक्ष सोम मित्तल यांनी सांगितले.

`नासकॉम’ने आयोजित केलेल्या `सर्ज २०१२’ या चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले की, डॉलरसमोर रूपयाची होणार्‍या घसरणीचा आयटी उद्योगाला आगामी काळात फायदाच होईल. नजीकच्या काळात त्याचा फारसा लाभ झालेला दिसणार नाही, असेही ते म्हणाले. मात्र त्याचवेळी त्यांनी रूपया स्थिर राहायला हवा. सरकार रूपयामध्ये स्थिरता आणण्यास लवकरच यशस्वी होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आयटी कंपन्या आता नव्या बाजारपेठांकडे वळत आहेत. युरोप, दक्षिण अमेरिका व आखाती देशांमध्ये या कंपन्यांची भरभराट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दक्षिण अमेरिका व आखाती देशांमधील संधी तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. दीर्घ काळात जेथे सर्वाधिक संधी आहेत, अशा भागावर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक व सरकारमधील विश्‍वासाचे नाते कायम राखण्यासाठी धोरणांमध्ये स्थिरता असण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

चालू वर्षामध्ये आयटी उद्योगांमधून एक लाख ६० हजार ते एक लाख ८० हजार नोकर्‍यांच्या संधी निर्माण होतील, असा अंदाज सोम मित्तल यांनी वर्तविला. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक लाख विद्यार्थ्यांना यासंबंधी ऑफर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षासाठी दोन लाख नव्या नोकर्‍यांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Leave a Comment