पाकिस्तान पंतप्रधानांच्या घरात हॅलिपॅडची उभारणी सुरू

इस्लामाबाद दि.२७- पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान रझा परवेझ अश्रफ यांच्या खासगी निवासस्थानी हॅलिपॅड उभारण्याचे काम सुरू करण्यात आल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. हे हॅलिपॅड सरकारी खर्चातून करण्यात येत असल्याने विरोधकांचा त्याला विरोध आहे मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांच्या घरापासून राजधानीत जाण्यासाठीच्या १४ किमीच्या रस्त्यात सुरक्षा ठेवण्यापेक्षा हॅलिपॅड उभारून पंतप्रधानांना हॅलिकॉप्टरने नेणे कमी धोक्याचे आहे आणि व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेसाठी खासगी घरातही हॅलिपॅड उभारण्यात कांही गैर नाही.

पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबरोबर रझा यांनी पाकिस्तानात असलेल्या अभूतपूर्व वीज तुटवड्यावर तातडीने मार्ग काढण्याची घोषणा केली होती. आज लक्षावधी नागरिक दिवसांतील अठरा अठरा तास वीजविना काढत आहेत. पाकिस्तानची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. गरीबीत खितपत असलेल्या जनतेत पंतप्रधानांसाठी हॅलिपॅड उभारण्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो असे विरोधकांचे म्हणणे आहे. पंतप्रधानपदाचे सर्व फायदे उपभोगताना देशाच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

मात्र या टीकेला न जुमानता हॅलिपॅड उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पंतप्रधान राजधानीतच राहणार असले तरी आठवड्याची सुट्टी ते आपल्या गुजरखान या इस्लामाबादपासून १४ किमीवर असलेल्या खासगी घरात व्यतीत करणार आहेत. या मार्गावर जा- ये करायची तर पंतप्रधान जातील तेव्हा किमान ३०० सुरक्षा रक्षक तैनात करावे लागतील असे पोलिस यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यापेक्षा हॅलिकॉप्टरचा वापर अधिक सोयीचा आहे असा युक्तिवादही केला जात आहे.

Leave a Comment