पंढरपूर, दि. २८ – आषाढी एकादशी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला असून संतांच्या पालख्यांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली असून दोन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. पददर्शन रांगेत मंदिर समितीने पिण्याची व्यवस्था केली नसल्यामुळे भाविकांना एक रूपयास एक पाण्याचा तांब्या विकत घेवून पाणी प्यावे लागत आहे. दर्शन रांगेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे घुसखोरी होत आहे. त्यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संताच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील भाविक पुढे येवून श्रीविठ्ठलाचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे पंढरीत दोन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. भाविकांनी श्रीविठ्ठलाच्या पददर्शनासाठी रांग लावली असून, पददर्शन रांग श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपाचे सहा मजले भरून गोपाळपूर रोडवरील पत्राशेडमध्ये पोहचली आहे. श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने पददर्शन रांगेमध्ये घुसखोरी होवू नये म्हणून विणे गल्ली ते श्रीविठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय असे ५ ते ७ किलोमीटर लांब बॅरेकेटींग केले आहे. मात्र पददर्शन रांगेस पुरेसा पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे अनेक ठिकाणी भाविक पददर्शन रांगेत घुसखोरी करत होते. त्यामुळे भाविकांमध्ये खडाजंगी उडत होती.
मात्र प्रशासनाकडून अद्यापही रॉकेल वाटपाची व्यवस्था सुरू करण्यात आली नसल्यामुळे भाविकांना रॉकेलसाठी वनवन भटकावे लागत आहे. यात्रेसाठी दोन लाख लिटर रॉकेलची आवश्यकता असताना शासनाने फक्त ८५ हजार लिटर रॉकेल यात्रेसाठी दिले आहे. त्यामुळे रॉकेल मिळविण्यासाठी भाविकांना तारेवरील कसरत करावी लागणार आहे. पंढरीत लाखो भाविक दाखल झाल्यामुळे पंढरीतील रस्ते, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षणा मार्ग गर्दीने फुलून गेला आहे. यात्रेसाठी व्यापार्यांनी दुकाने थाटली आहेत.