
जून महिना संपत आला. अजून पेरणी नाही. ती कधी होईल याची काही शाश्वती नाही. महाराष्ट्रातले लाखो वारकरी ( जे प्रामुख्याने शेतकरीच असतात) महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानीकडे विटेवर उभ्या असलेल्या काळ्या परब्रह्माच्या दर्शनाच्या ओढीने पायी चालले आहेत. त्यांची मने पूर्ण भक्तीने भरली आहेत. पण त्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. त्यांच्या पोटाला धान्य देणारे खरे काळे परब्रह्म तिथे बसले आहे पण ते काही बरसत नाही. जीवाला घोर लागून राहिला आहे. आपण मुक्त अर्थव्यवस्थेची वाट धरून औद्योगीकरणाकडे मोठी घोडदौड सुरू केली असली तरी अजूनही आपली अर्थव्यवस्था पावसावर अवलंबून असते म्हणूनच पावसाने गुंगारा देताच केवळ शेतकरीच नव्हे तर सारे अर्थविश्व चिंताग्रस्त झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाऊस वेळेवर पडेनासा झाला आहे. गतवर्षी तो कमी पडला आणि सार्या महाराष्ट्राला पाण्याच्या किती भीषण टंचाईला तोंड द्यावे लागत आहे याचा आपण अनुभव घेतच आहोत. पण आता यंदाही पाऊस नीट पडला नाही, तर मोठे संकट कोसळल्यागत होईल अशी भीती, स्वच्छ आभाळाकडे पाहून मनात दाटून यायला लागली आहे. सलग दुसरे वर्षी दुष्काळ पडतो की काय, अशी शंका मनात दाटून यायला लागली आहे. तसे झाल्यास महाराष्ट्राचे सामाजिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. दुष्काळ पडल्यास ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होत नाही आणि ग्रामीण भागातले लोक मोठ्या संख्येने शहराकडे स्थलांतर करायला लागतात. १९७२, १९८४ आणि २००३ या तीन वर्षांत पडलेल्या दुष्काळांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची पूर्ण वाताहत झाली असून लाखो खेडुत मोठ्या शहरांच्या आश्रयाला गेले आहेत. खेडी ओस पडत आहेत.