नवी दिल्ली, २७जून-आघाडीची मोटार उत्पादक मारुती सुझुकीने पुन्हा एकदा ८०० सीसीच्या मोटारीकडे आपला मोर्चा वळवला आहे. ज्या मोटारीने देशभरात कंपनीला नावलौकिक मिळवून दिला त्या मोटारीला नवीन रूपात आणण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. येत्या दिवाळीमध्ये ‘मारुती ८००’ चा नवा अवतार ग्राहकांना बघायला मिळणार आहे.
सध्या कंपनीची ८०० सीसीची दोन मॉडेल बाजारात आहेत. मात्र, यापेक्षाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नवीन मोटारीमध्ये करण्यात आला आहे. अधिक इंधन कार्यक्षम असणार्या या नवीन मोटारीची किंमत ‘आल्टो’ आणि ‘मारुती ८००’ पेक्षाही अधिक असणार आहे. मारुती ८०० सीसीच्या मॉडेलची किंमत २.०५ लाख ते २.३० लाखांच्या दरम्यान आहे. तर आल्टोची किंमत २.४० लाख ते ३.४२ लाखाच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर १००० सीसीच्या आल्टोची किंमत ३.१४ लाख ते ३.३१ लाखांच्या दरम्यान आहे.
गुडगाव प्रकल्पामध्ये पुढच्या महिन्यापासून नव्या मारुती ८०० सीसीचे उत्पादन सुरू करण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे. कंपनीने या मोटारीचे डिझाइनही तयार केले असून याच्या विविध चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. यामुळे लवकरच बाजारात आणण्याच्या दृष्टीने कंपनी जोरदार प्रयत्न करत आहे.
चढे व्याजदर, इंधनाच्या किमतींमध्ये झालेली भाववाढ यामुळे मोटारविक्रीला ब्रेक बसला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीच्या ‘आल्टो के१०’ सारख्या लहान मोटारींची विक्रीही घटली आहे. पेट*ोलची भाववाढ मोटार उत्पादक कंपन्यांना चांगलीच महागात पडली असून अनेक मोटार डीलरकडे मोटारींचा मोठा साठा आहे. यामुळेच विक्रीला बळ देण्यासाठी अधिक इंधन कार्यक्षम असलेल्या लोकप्रिय मारुती ८०० चे नवीन मॉडेल बाजारात आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.