आदर्श ला मंजुरी अशोक चव्हाणांचीच – विलासराव

मुंबई, दि. २८ – `आदर्श’ला परवानगी तत्कालीन महसूलमंत्री अशोक चव्हाणांचीच असल्याचा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चौकशी आयोगासमोर केला. त्यामुळे अशोक चव्हाण अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

महसूल खात्याकडून तपासून आलेल्या फाईल्समधील प्रत्येक पान मुख्यमंत्र्यांना तपासणे शक्य नसते, मी केवळ `सह्याजीराव’ होतो, `आदर्श’च्या फाईल्स मुख्य सचिवांनी तपासल्या असल्याची साक्ष मंगळवारी देशमुखांनी आयोगासमोर दिली होती.

बहुचर्चित आदर्श हाऊसिंग सोसायटीच्या घोटाळ्या प्रकरणी विलासराव देशमुखांची बुधवारी उर्वरित साक्ष घेण्यात आली. त्यात त्यांनी पुन्हा अशोक चव्हाणांकडे बोट दाखविले. विशेष म्हणजे `आदर्श’ला चव्हाणांनी परवानगी दिली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. इरादापत्रावर महसूलमंत्री आणि अर्थमंत्र्यांचीही स्वाक्षरी होती, असा गोप्यस्फोटही देशमुखांनी केला.

इमारतीसाठी जमीन देण्याचा आदेशाच्या फाईल्स मुख्य सचिवांनीच तपासल्या होत्या, असे सांगून विलासराव देशमुखांनी हात झटकले होते. अशोक चव्हाणांची साक्ष ३० जूनला होणार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण चौकशीत कोणता गौप्यस्फोट करणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment