भारतातील अतिरेकी कारवायांना स्थानिक लोकांची साथ असतेच. त्याशिवाय त्यांना आपल्या कारवाया करणे शक्यच होणार नाही. असे असले तरी कोणातरी पाकिस्तानी अतिरेक्याला अटक केली जाते आणि त्याच्या स्थानिक कनेक्शनकडे दुर्लक्ष केले जाते. या बाबत काही आरडा ओरडा होतो, तेव्हा कसून तपास केला तर दहशतवादी कारवायांचे स्थानिक धागेदोरे कसे हाती येतात, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातल्या गेवराईचा जबीउद्दीन अन्सारी. लष्करे तैयबा या पाकिस्तानातील संघटनेचा भारतातील हस्तक असलेला जबीउद्दीन अन्सारी दिल्लीमध्ये पकडला गेला. भारतात २००६ सालपासून झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमागे त्याचा हात होता असे निष्पन्न झाले आहे. मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या कुप्रसिद्ध दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तोच होता, असा संशय असल्यामुळेच पोलीस त्याच्या मागावर होते आणि आता अटक झाल्यानंतर त्याने ही गोष्ट कबुल केली आहे. त्याशिवाय भारतातल्या चार मोठ्या बॉम्बस्फोटांच्या घटनांमागे तोच होता हेही आता कळून चुकले आहे. २००६ सालपासून तो पोलिसांना हवा होता.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठ्या जवळच्या जंगलामध्ये एक मोठा शस्त्रसाठा सापडला होता. तो कोणी ठेवला याचा शोध घेत असतानाच या अन्सारीचे नाव निष्पन्न झाले होते. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होऊन देशाला हादरवून टाकणार्या घटना घडवाव्यात असे वाटावे अशी कसलीही पार्श्वभूमी नसताना महाराष्ट्रातले बीड हे शहर या कारवायांचे केन्द्र झाले, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. बीड जिल्ह्यातले सहा तरुण अतिरेकी कारवायांत गुंतल्याच्या आरोपावरून पोलिसांच्या ताब्यात आहेत. यामध्ये सोलापूर शहरातल्या एका तरुणाचाही समावेश आहे. त्याला अटकही झालेली आहे. पण त्याचे पुढे काय झाले हे कळले नाही. कदाचित त्याचा तपास सुरू असेल. सोलापूरचा एक तरुण अशा कारवायात गुंतलेला आहे ही गोष्ट उघड झाली तेव्हा त्या तरुणाच्या दुर्दैवी आई-वडिलांना खूपच वाईट वाटले. आता जबीउद्दीन अन्सारी याच्याही वडिलांना आपला हा दिवटा काय उद्योग करत होता हे कळले तेव्हा धक्का बसला.
पुण्यातल्या जर्मन बेकरीतल्या स्फोटातला एक आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग हाही बीडचाच राहणारा होता. त्याला स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा आरोपी सईद जबिउद्दीन याला काल दिल्लीत अटक करण्यात आली.
बेग याच्या वडिलांना सुद्धा आपला मुलगा काय करत होता हे आपल्याला माहीत नव्हते, परंतु माहीत झाले तेव्हा धक्का बसला आहे असे प्रतिपादन केले. या तिघांच्याही घरच्या लोकांची ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आश्चर्य सुद्धा वाटते. एखादा मुलगा घर सोडून जातो, सहा-सहा वर्षे बेपत्ता राहतो आणि त्याचे आई-वडील मात्र तो काय करत होता हे आपल्याला माहीत नव्हते असे म्हणतात. कदाचित आपली मुले दहशतवादी कारवायांत सहभागी असतील आणि हजारो लोकांच्या जीवाशी खेळ करणार्या देशद्रोही कारवायांत सहभागी असतील हे त्यांना माहीतही नसेल. त्यांची या मुलांना फूस होती किंवा त्यांचे उद्योग माहीत असूनही या आई-वडिलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप आई-वडिलांवर आपल्याला करायचा नाही. परंतु या पालकांची आपल्या मुलांच्या उद्योगाकडे जे दुर्लक्ष होते ते मात्र अक्षम्य आहे. आपली मुले काय उद्योग करतात हे माहीत नाही म्हणजे आपल्या मुलाने काय करावे याबाबत हे पालक जागरूक नाहीत असे दिसते. अन्सारी बीड येथे सिमीचा कार्यकर्ता म्हणून काम केले होते. त्याने बीड जिल्ह्यात सिमीचे जाळे पसरवण्याचा प्रयत्न केला होता.
सिमी या संघटनेवर सरकारने बंदी घातली होती पण ही बंदी हा एक विनोद होता. कारण सिमीचे बंदीपूर्वीचे कार्यकर्ते नाव बदलून आणि इंडियन मुजाहेदीन म्हणून कार्यरत होते.
सिमी ही संघटना राष्ट्रविरोधी असते आणि तिचे कार्यकर्ते संघटनेचे नाव बदलले म्हणून काय राष्ट्रप्रेमी ठरतात काय ? या सिमीच्या जुन्या कार्यकर्त्यांची झाडा झडती घेतली पाहिजे. तिचे जाळे महाराष्ट्राच्या अनेक भागात आहे. पूर्वी सिमीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांनी काम केले असेल आणि त्यातले जे कार्यकर्ते आता बेपत्ता झाले असतील त्यांचा पोलिसांनी कसून तपास केला पाहिजे. नाही तर त्यांच्या पालकांना आपला मुलगा सिमीचा कार्यकर्ता होता हे तरी माहीत असेलच की नाही? त्या दिशेने तपास झाला पाहिजे. दहशतवादी संघटनांत सहभागी होणारी मुले या चळवळीत का जातात ? त्यामागे कोणती प्रेरणा असते यावर बरेचदा चर्चा केली जाते. काही लोक ही मुले गरिबीमुळे आणि पैशाच्या प्रलोभनाने या कारवायात सहभागी होतात असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. १९९० च्या दशकात विशेषत: काश्मिरी तरुणांत ही प्रवृत्ती दिसत होती पण नंतर अगदी श्रीमंत घरातले तरुणही या जाळ्यात अडकत असल्याचे दिसायला लागले. त्यात काही इंजिनियर होते तर काही पदवीधर आणि उत्पन्नाची चांगली साधने असणारेही होते. या लोकांच्या धार्मिक भावनांना खतपाणी घालूनच त्यांना या जाळ्यात ओढले गेले आहे.