अमिताभ बच्चन यांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी खोटी

ग्लोबल असोसिएटेड न्यूज नावाच्या एका वेबसाईटवर भारतातले प्रसिद्ध अभिनेते, बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी देण्यात आली आहे. मॉरिस टाऊन, न्यू जर्सी येथे अमिताभ त्यांच्या मित्राची गाडी चालवत असताना गाडीवरचे नियंत्रण सुटून अपघात झाला व त्यात अमिताभचा मृत्यू झाला असे या बातमीत म्हणले गेले आहे. मात्र ही निव्वळ अफवाच असल्याचे उघडकीस आले आहे. आपल्याकडे निधनाची खोटी वार्ता आली तर त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते असा समज आहे. त्यामुळे अमिताभ यांचे आयुष्य वाढले असाच यातून अर्थ काढणे योग्य ठरेल.

अधिक चौकशी करता ही वेबसाईट बनावट असून यापूर्वीही याच वेबसाईटवर हॉलिवूडमधील जिम कॅरी, विल स्मिथ,सेंडलर, टॉम हॅक्स अशा प्रसिद्ध कलाकारांच्या मृत्यूच्या बातम्या देण्यात आल्या होत्या. एखादा लोकप्रिय आणि प्रसिद्ध कलाकार गेल्याची बातमी दिली गेली तर लोक त्यावर चटकन विश्वास ठेवतात आणि मग ही बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरते याचा फायदा घेऊनच कांही साईटस अशा बिनबुडाच्या बातम्या देतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. सवंग प्रसिद्धीचा हा एक मार्ग आहे.

कांही दिवसांपूर्वीच ट्विटरवरही लोकप्रिय लेखक ,गायक आणि अभिनेता असलेल्या जस्टीन बीबर यांच्याही मृत्यूची बातमी देण्यात आली होती आणि लोकांचा चौकशीचा इतका ओघ सुरू झाला की अखेर खुद्द जस्टीनला मी जिवंत आहे असे ट्विट करावे लागले. मायकेल जॅक्सनचा मृत्यू झाला त्याच दिवशी बिटनी स्पिअर्स या गायिकेच्या मृत्यूची अशीच हूल उठविण्यात आली होती. लिंडसे लोहान आणि पॅरिस हिल्टन या अभिनेत्रींच्या निधनाच्या अशाच खोट्या बातम्या देण्यात आल्या होत्या.

Leave a Comment