व्हिनस विल्यम्स पहिल्याच फेरीत विंबल्डनबाहेर

लंडन, २६ जून-पाचवेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणार्‍या व्हिनस विल्यम्सवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे.रशियाच्या एलिना वेसनिनाने ३२ वर्षीय व्हिनसला ६-१ , ६-३ असे सहज नमविले. १९९७ मध्ये विम्बल्डन पदार्पण करणार्‍या व्हिनसला पंधरा वर्षांत प्रथमच अशा नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.
दुसरीकडे तिसर्‍या सीडेड अग्नेस्का रॅदवाँस्का आणि ग्रँडस्लॅम जेतेपद विजेत्या सॅमन्था स्तोसूर व लि ना यांनी सोमवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. दोनवेळा उपांत्यपूर्व फेरी गाठणार्‍या रॅदवाँस्काने स्लोवाकियाच्या मगदालेना रायबरिकोवाला ६-३ , ६-३ असे सहज नमविले. दुसर्‍या फेरीत रॅदवाँस्काचा सामना एलेना वेसनिनाशी होईल.

२०११मध्ये अमेरिकन ओपन जिंकणार्‍या सॅमन्था स्तोसूरने स्पेनच्या कार्ला सॉरेझ नवारोला ६-१ , ६-३ असे नमविले. सॅमन्थाला गेल्या दोन वर्षांत विम्बल्डनमध्ये साजेशी कामगिरी करता आली नव्हती. गेल्या दोन वर्षांत ती येथे सलामीलाच गारद झाली होती. विम्बल्डनमध्ये तिला फारफार तर तिसर्‍या फेरीपर्यंतच मजल मारता आली आहे. सोमवारी मात्र स्तोसूरने सॉरेझला फारशी संधीच दिली नाही. संपूर्ण सामन्यात तिचेच वर्चस्व होते.

२०११ची फ्रेंच ओपन विजेती लि नानेही सहज विजय नोंदविला. अकराव्या सीडेड लिने रशियाच्या कसेनिया पर्वकचा ६-३ , ६-१ असा धुव्वा उडविला. जर्मनीच्या पंधराव्या सीडेड सबिन लिसिकीने क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिचचा ६-४ , ६-२ असा पराभव केला. लिसिकीने गेल्यावर्षी विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती. यंदा तिच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

पहिल्याच दिवशी फ्लॅविया पेनेत्ताच्या निमित्ताने सीडेड खेळाडूला गाशा गुंडाळावा लागला. इटलीच्या कॅमिला गिओर्गीने १६व्या सीडेड पेनेत्ताला ६-४ , ६-३ असे नमवून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

जोकोविच दुसर्‍या फेरीत
अव्वल सीडेड नोवॅक जोकोविचने विम्बल्डनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. या गतविजेत्या सर्बियन खेळाडूने स्पेनच्या ज्युआन कार्लोस फेरेरोवर ६-३ , ६-३ , ६-१ अशी सहज मात केली. जोकोविचचा पुढील फेरीतील सामना अमेरिकन रायन हॅरिस विरुद्ध ल्यू येन सन यांच्यातील विजेत्याशी होईल.

Leave a Comment