साहेबांचे डोळे पाणावले !

मुंबई,२५ जून-दुपारचे १२ वाजून गेले. मीरा रोडच्या मघा बिल्डींगसमोर परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी, बाहेर जोरात पाऊस, माध्यम प्रतिनिधींचीही प्रचंड गर्दी. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मंत्रालयात लागलेल्या आगीत मृत्यू पावलेल्या चोपदार मोहन मोरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी येणार असल्याने सारा परिसर शोकसागरात बुडाला. कुणीच कुणाशी बोलत नव्हते.

सुन्नपणे मुख्यमंत्री येण्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. १२ वाजून ३० मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. मुख्यमंत्री गाडीतून उतरले आणि थेट पायर्‍या चढत मोरे यांच्या घरात पोहोचले. वातावरण एकदमच गंभीर झाले. मोरे कुटुंबीयांतील सर्वांचेच डोळे पाणावले.

मुख्यमंत्र्यांनी मोहन मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला आणि कुटुंबीयांसमवेत बसले. क्षणभर काय बोलावे ,कुणालाच काही सूचेना. काही महिला रडत होत्या. काही नातेवाईक सुन्न होऊन पहात होते. त्या सर्वांचेच डोळे पाणावले होते. मुख्यमंत्रीही काही वेळ हेलावून गेले. त्यांनी स्वतःला सावरत कुटुंबीयांना धीर दिला. मुलाच्या पाठीवरून हात फिरवला. यावेळी वातावरण आणखीनच गंभीर झाले. सर्वांनाच रडू कोसळले. सर्वांनीच अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

‘ काळजी करू नका- तुमच्या पाठीशी सरकार आहे. तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल. झाले ते वाईट झाले’ मुख्यमंत्री धीरगंभीर आवाजात म्हणाले. आता मात्र साहेबांचेही डोळे पाणावले. लगेच त्यांनी स्वतःला सावरले. मुख्यमंत्री चव्हाणसाहेबांनी शासन खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगून मोरे कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. साहेब उठले.

साहेबांनी सर्वांना नमस्कार केला.मुलाच्या पाठीवरून हात फिरवला. जाताना मोहन मोरे यांच्या प्रतिमेकडे त्यांनी क्षणभर पाहिले. डोळे मिटले. त्यांच्या मनात मोरेंच्या आठवणीने एकच कल्लोळ केला आणि जड अंतःकरणाने ते घराबाहेर पडले!

Leave a Comment