सर्व सरकारी इमारतींचे फायर ऑडिट करणार’

मुंबई, दि.२५ – मंत्रालयाला लागलेल्या आगीची केंद्रीय आपत्ती व्यवस्थापनामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच सर्व शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करण्यात येईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले. अग्नीतांडवानंतर चार दिवसांनी आज मंत्रालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. याबाबात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मंत्रालयात सुरुवातीचा आठवडाभर फक्त अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. झालेल्या दुर्घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या कागदपत्रांसोबतच आदर्शच्या फाईल्सही सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्रालयाच्या उर्वरीत विभागांसाठी पर्यायी जागा उपलब्ध झाली असून तिथे त्यांचे काम पर्यायी जागेत सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment