सत्यमेव जयते : आईचे अमृततुल्य दूध बनले विषारी

दररोजचे अन्न किती विषारी असते, याची आपल्याला जाणीव नाही. अनेक भाज्या आणि धान्यांमध्ये किटनाशकाचे अंश आढळून येतात. हा प्रकार एवढा भयानक आहे की चक्क आईचे अमृततुल्य दुधही या किटनाशकांनी विषारी बनविले आहे. अभिनेता आमिर खानने अन्नातील किटनाशकांचा मुद्दा सत्यमेव जयतेच्या माध्यमातून आज मांडला. त्यातून अनेक खळबळजनक तथ्ये समोर आली.

शोच्या सुरुवातीला आमिर खान म्हणाला, मुलाच्या आहाराची सुरुवात आईच्या दुधापासून होते. आईचे दुध तिच्या तान्हुल्यासाठी अमृततुल्य असते. परंतु, त्यात चक्क प्रमाणापेक्षा ८०० टक्के किटनाशक आढळले आहे. आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञा रश्मि सांघी यांनी शोमध्ये माहिती देताना सांगितले की, आईच्या दुधाचे काही नमुने तपासले. त्यात निर्धारीत प्रमाणापेक्षा चक्क ८०० टक्के एंडोसल्फान हे किटनाशक आढळले. त्यामुळे आईचे दुध मुलासाठी किती सुरक्षित आहे, हा प्रश्न निर्माण होतो.
एंडोसल्फान हे शेतावर फवारणी करण्यात येणारे किटनाशक आहे. अन्नाद्वारे ते आईच्या दुधापर्यंत पोहोचते आणि त्यातुन ते मुलामध्ये जाते.

एंडोसल्फानमुळे आयुष्याची झाली माती
केरळच्या कासरगोडमध्ये तर एंडोसल्फानमुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल २५ वर्षांपर्यंत तेथे एंडोसल्फानची फवारणी करण्यात येत होती. लाखो लिटर किटनाशक जनतेच्या शरीरात भिनले. त्यामुळे त्यांचे आयुष्याची अक्षरशः माती झाली.
कासरगोडमध्ये अनेक वर्षांपासून गावकर्‍यांवर उपचार करीत असलेले डॉ. मोहन कुमार यांनी या भागातील वास्तवाचे वर्णन केले. केरळ सरकारने या भागात काजूची शेती करणे सुरु केले. १९७६ पासून काजुच्या झाडांना किटकांपासून वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एंडोसल्फानची फवारणी सुरु करण्यात आली. सुमारे १५ हजार एकर जमिनीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून फवारणी करण्यात येत होती. हा प्रकार २५ वर्षांपर्यंत सुरु होता. लाखो लिटर किटनाशकाची फवारणी करण्यात आली. अन्नाद्वारे हे किटनाशक लोकांच्या रत्त*ात भिनले.

डॉ. मोहन कुमार यांनी या भागात दवाखाना सुरु केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की दिर्घ काळापासून कर्करोग, अर्धांगवायू, अपंगत्त्व, मेंदुचे आजार, असे अनेक भयंकर विकारांनी ग्रस्त होते. अनेक महिलांचा गर्भपात होत होता. एक महिलेचा तर १० वेळा गर्भपात झाला. असे का व्हायचे, या प्रश्नाने ते हैराण झाले होते.
कासरगोडमधील ही वस्ती एका नदीकाठी वसली होती. या भागात कोणतेही प्रदुषण नव्हते. परंतु, एंडोसल्फानमुळे प्रचंड प्रदुषण पसरले. एंडोसल्फानच्या फवारणीला विरोध केला. परंतु, मोहन कुमार यांच्यावरच हल्ले झाले. आजही प्रदुषणामुळे हजारो लोक नानाविध व्याधींनी ग्रस्त आहेत.