मंत्रालय आग- मृतांच्या वारसांना २५ लाखांची मदत

मुंबई, दि. २५- मंत्रालयातील अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांच्या वारसांना प्रत्येक २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मंत्रालयात लागलेल्या आगीनंतर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याअसून आता सर्व शासकीय इमारतींचे फायर ऑडिट होणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय मोहन मोरे यांच्या कुटुंबियातल्या एकाला मंत्रालयात नोकरी देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

आज कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम आगीत मृत्युमुखी पडलेल्या पाचजणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यापासून ते तिसर्‍या मजल्यापर्यंत ऑफिसेस सुरू करण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री चव्हाण यानी दिली. चौथ्या, पाचव्या, सहाव्या मजल्यावर अद्याप साफसफाईचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

इमारतीमधील पहिल्या तीन मजल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून अन्य मजल्यांचे ऑडिट होणे अद्याप बाकी असल्याचे सांगून ते म्हणाले, तिसर्‍या मजल्या खालील सर्व ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. सर्व विभागाची कामे त्यांना देण्यात आलेल्या पर्यायी जागेत सुरू करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत सर्व्हर नसल्याने आगीत सर्व्हरला कोणताही धोका पोहचलेला नाही. त्यातील सर्व डेटा सुरक्षित आहे. आगीत जळालेल्या संगणकातील केवळ १० टक्के संगणकांच्या हार्ड डिक्स चांगल्या स्थितीत असून त्यातील डेटा नव्या सिस्टीममध्ये गोळा करण्यात येत आहे. डिजेएमएस सिस्टीममुळे जळालेल्या अनेक फाईलींची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी १५ दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच जळालेल्या फाईलमधील माहिती मिळवणे हे काम कठिण जरी असले तरी अशक्य नाही, असेही त्यांनी राज्याच्या जनतेला सांगितले.

बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक ठरल्याप्रमाणे होईल, तसेच विधिमंडळाचे अधिवेशनही नऊ जुलै रोजी सुरू होईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. क्राईम ब्रांचकडे चौकशी दिली असून त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली आहे. लवकरच त्यांचा रिपोर्ट ते सादर करतील. या निमित्ताने ई-गव्हर्नन्सकडे आपला कारभार वळवण्यार भर दिला जाणार आहे. तसेच पेपरलेस ऑफिसचेही प्रयत्न सुरू आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रालयात २१ जून रोजी लागलेल्या आगीत मोहन मोरे, तुकाराम मोरे हे मंत्रालयाचे कर्मचारी तर अकोल्याचे शिवाजी कोरडे, बारामतीचे उमेश पोतेकर आणि महेश गुगळे यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment